वर्धा: काय म्हणावे या शिक्षकांना ? ज्यांचे गुणगान नेहमी केल्या जाते, शिक्षकदिनी सन्मान, समाजात आदराचे स्थान. पण काही वेगळे नमुने असतात जे शाळा व गावास वेठीस धरतात. असेच दोन नमुने चर्चेत आहेत. दारूबंदी गांधी जिल्ह्याचा नवलौकिक धुळीस मिळविणाऱ्या या कलंदर शिक्षकांना निलंबित करण्याचा निर्णय झाला आहे.

वर्धा जिल्हा परिषदेच्या बोपापूर शाळेतील ही घटना आहे. या ठिकाणी कार्यरत धनपाल राऊत व प्रभाकर वाळके हे दोघे आता चर्चेत आहे. २९ जानेवारीस यांनी शाळेत मस्ती केली. एकमेकांवर शिवीगाळ व मारहाण झाली. विद्यार्थी शिक्षकांचे भांडण सोडवण्यास मध्ये पडले तेव्हा त्या बालकांना या शिक्षकांनी बुकलून काढले. काय झाले याचा प्रकार त्यांनी पालक व गावकरी यांना खुलेपणाने सांगितला. पण अट्टल शिक्षक ते, काहीच फरक पडला नाही. दुसऱ्या दिवशी परत हाणामारी झाली. शेवटी प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. नितु गावंडे यांनी तपास सुरू केला. तथ्य दिसले. अहवाल आल्यावर कारवाई करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

हे प्रकरण किती लज्जास्पद आहे याची जाणीव झालेले वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांना झाली. तशी त्यांनी भावना व्यक्त केली. लोकसत्तासोबत बोलताना ते म्हणाले की हे जरा अतीच. एकदा, नव्हे तर दोनदा हा मारहाणीचा प्रकार घडला. गावकरी व विद्यार्थी त्रस्त आहेत. या दोन्ही शिक्षकांस निलंबित करणार. निर्णय पक्का आहे. सायंकाळी तसे लेखी आदेश होतील. तर प्राप्त माहितीनुसार यापैकी एक शिक्षक इतका लतखोर की ज्याची विभागीय चौकशी आत्ताच पूर्ण झाली. त्याने गोजी व अन्य शाळेत धिंगाणा घातला म्हणून ही चौकशी होती. ती होत नाही तोच हा गोंधळ त्याने घातल्याने शिक्षक वर्तुळत चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वर्धा जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांत सावळा गोंधळ सुरू असल्याच्या नेहमी चर्चा असतात. त्यात काही वेळा शिक्षक नेते पण अडकतात. शिक्षक कसे नसावे तसेच कसे असावे याचा वस्तूपाठ पण याच शाळेत मिळतो. पण राजकीय दबाव येतो आणि उधम करणारे शिक्षक सांभाळून घेतल्या जातात. पण या प्रकरणात हद्द झाल्याचे म्हटल्या जाते. जाहीर तमाशा करणाऱ्या या दोन्ही शिक्षकांच्या बचावर्थ एकही पुढे आला नसल्याचे समजते.