फोर्थ डायमेन्शन फोटोग्राफर्स क्लबचा उपक्रम; दुरवस्था झाल्याने मौल्यवान ठेवा नागरिकांपासून दूर
एखाद्या शहराला ऐतिहासिक वारसा असणे हे त्या शहरासाठी भूषणावह ठरते, पण त्याहीपेक्षा तो वारसा टिकवून ठेवणे हे अधिक महत्त्वाचे! शहर आधुनिक होत गेले तरी शहराची संस्कृती त्या वारस्याच्या रुपाने नव्या पिढीसमोर कायम राहते. मात्र, ऐतिहासिक वास्तूंचा हा वारसा आधुनिकीकरणाच्या काळात कायम दुर्लक्षित होत राहिला. त्यासाठी एकटय़ा पुरातत्त्व खात्याकडे बोट दाखवून चालणार नाही, तर नागरिकही त्यासाठी तेवढेच जबाबदार आहेत. अशाच या दुर्लक्षित वारसा जतनाकडे साऱ्यांचे लक्ष जावे म्हणून फोर्थ डायमेन्शन फोटोग्राफर्स क्लबच्या छायाचित्रकारांनी छायाचित्रांच्या माध्यमातून घेतलेला वेध सर्वासाठीच माहितीपूर्ण ठरत आहे.
पाश्चिमात्य जीवनशैली आणि इंग्रजाळलेले शिक्षण यात नागपूर आपली संस्कृती हरवत चालले आहे. मात्र, नागपूरच्या ऐतिहासिक संस्कृतीचा वारसा ‘महाल’ने जोपासला आहे. खरेखुरे ऐतिहासिक परंपरेचे महाल येथे आहेत. मुळातच नागपूर शहराचा इतिहास देवगडचे गोंड राजे बख्त बुलंदशाह, त्यांचे पुत्र चांद सुल्तान व त्यानंतर राजे रघुजी भोसले यांच्या कारकीर्दीत बहरलेला आहे. १७४२ पासून भोसले राजवट सुरू झाली आणि त्यांचे राजवाडे ही नागपूरच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक बनली. या राजवाडय़ांव्यतिरिक्तही नागपुरात बरेच काही आहे. मात्र, अध्र्याहून अधिक नागपूरकरांना ते माहिती नाही, कारण त्यांची दुरवस्था झाली आहे.
या वास्तू जतनाची जबाबदारी पुरातत्त्व खात्याचीच नव्हे तर नागरिकांचीसुद्धा आहे, पण आधुनिकीकरणाच्या काळात या वास्तूंना जंग चढला. फोर्थ डायमेन्शन फोटोग्राफर्स क्लबच्या या उपक्रमातून पुन्हा एकदा या ऐतिहासिक व सांस्कृतिक वैभवाच्या जोपासनेचे प्रयत्न होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या प्रदर्शनात महालमधील गिरी मंदिर, काळीकर मंदिर, काशीबाई मंदिर, भोसल्यांचे समाधी स्थळ म्हणून ओळखले जाणारे जामदार मंदिर, चिटणीस वाडा आणि या वाडय़ातील मंदिर, गोंड मंदिर, बाकाबाई वाडा (सध्या या ठिकाणी डी.डी. विद्यालय सुरू आहे), अतिशय दुर्लक्षित असे केळीकर मंदिर, मुन्शी मंदिर, अनेक दिग्गज गायकांच्या मैफली गाजवणारा ऐतिहासिक देशमुख वाडा अशा अनेक कलाकृती या प्रदर्शनात आहेत. त्या पाहिल्यानंतर एवढा गर्भश्रीमंत वारसा आपल्या नजरेतून कसा सुटला, असा प्रश्न याठिकाणी येणाऱ्या प्रत्येकालाच पडत आहे. या प्रदर्शनाला दर्शकांचा मोठय़ा प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. अनेकांनी या प्रदर्शनाविषयी आवर्जुन मत व्यक्त केले. अशी प्रदर्शने इतर ठिकाणीही मोठय़ा प्रमाणात भरविण्यात आली पाहिजे, अशी अपेक्षा यावेळी अनेक दर्शकांनी व्यक्त केली.
१६५ छायाचित्रे
फोर्थ डायमेन्शन फोटोग्राफर्स क्लबच्यावतीने छायाचित्रण कला अधिकाधिक दृढ करण्याकरिता नेहमीच वेगळे प्रयत्न केले जातात. या क्लबचे छायाचित्रकारसुद्धा नव्याच्या शोधात असतात. त्यातूनच त्यांनी महाल परिसराचा फेरफटका मारण्याचे ठरवले आणि त्यातून ऐतिहासिक संस्कृती त्यांना गवसली. या एक दिवसाच्या फेरफटक्यात ही संस्कृती छायाचित्रांमध्ये कैद होणे शक्य नव्हते. त्यामुळे संबंधित प्रशासनाची परवानगी घेऊन तब्बल दहा वेळा ते महाल परिसरात फिरले. फेरफटक्यातील सातत्त्याने सुमारे सहा ते सात हजार छायाचित्रे त्यांनी कॅमेऱ्यात बंदिस्त केली. त्यातील १४ छायाचित्रकारांची १६५ छायाचित्रे या प्रदर्शनात लावण्यात आली आहेत. ती पाहण्यासाठी दर्शकांनी मोठय़ा प्रमाणावर हजेरी लावली आहे.