महापालिकेचा निर्णय, नागरिकांची होणार गैरसोय

शहरात केवळ एक आठवडय़ासाठी सुरू केलेला एक दिवसा आड पाणी पुरवठा आता महापालिकेने आणखी एक महिन्यापर्यंत म्हणजे २२ ऑगस्टपर्यंत वाढवला आहे. मधल्या काळात पाऊस झाला तर ही पाणी कपात मागे घेण्यात येणार आहे. जलप्रदाय सभापती पिटू झलके यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

पाणी कपातीच्या निर्णयाला आठ दिवस झाल्याने सोमवारी त्याचा आढावा घेण्यात आला. कपातीमुळे प्रमुख धरणात जलस्तर वाढले असले तरी स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे कपातीची मुदत वाढवण्यात आली आहे. दरम्यान काळात शहराला पाणीपुरवठा कारणाऱ्या धरण क्षेत्रात जर समाधानकारक पाऊस झाल्यास ही कपात मागेदेखील घेण्यात येईल असेही झलके यांनी सांगितले. सध्या पेंच नदीवरील नवेगाव खैरी धरणात सध्या ३१८.३४ इंच पाणी आहे. कपातीमुळे यात गेल्या आठवडय़ाभराच्या १२६०दशलक्ष घनमीटर पाणी बचत झाली आहे. यामुळे धरणाची पाण्याची पातळी वाढली  आहे. त्यामुळे पुढील महिनाभर पाणी कपातीचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. कन्हान नदीत सध्या चांगले पाणी असल्याने तेथून उत्तर नागपूरला नियमित पाणीपुरवठा सुरू आहे. येथून सध्या १८ते २०दलघमी पाणी बेझनबागला पुरवठा करण्यात येत आहे.  दरम्यान, पाणी कपातीच्या दिवशी कुठेच टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार नाही. काही जण महापालिकेतून टँकर खरेदी करून पाणी मागवतात. मात्र पाणी कपाताच्या दिवशी पसे भरूनही टँकर मिळणार नाही, असेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहणे, उपमहापौर पार्डीकर, जलप्रदाय विभागाचे उपसभापती भगवान मेंढे उपस्थित होते.

जलतरण तलावांना पाणीपुरवठा नाही

जलतरण तलावाला महापालिकेकडून पाणी पुरवठा केला जाणार नाही. सर्व क्लब आणि हॉटेल्समध्ये जलतरण तलाव आहेत. तसेच एनआयटीसह महापालिकेचे जलतरण तलाव आहेत. मात्र येथे जर महापालिकेचे पाणी जलतरणासाठी वापरण्यात येत असेल तर पुरवठा बंद करण्यात येईल, असे झलके म्हणाले.

शासकीय कार्यालयांना इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शासकीय कार्यालयात मोठय़ा प्रमाणात गळती आहे. ती  दुरुस्त करावी, असे पत्र सर्व शासकीय कार्यालयांना पाठवण्यात येणार आहे. शिवाय पाण्याचा अपव्यव होताना दिसून येत असेल तर दंडात्मक कारवाई देखील केली जाणार आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय (मेडिकल) सोबतच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयालाही अंतर्गत पाणीपुरवठा करण्यात येईल मात्र त्यांनी आपली अंतर्गत गळती व दुरुस्ती करण्याबाबत पत्र देण्यात आले आहे.

बैठकीला महापौरांची दांडी

या महत्त्वाच्या बठकीला महापालिका, ओसीडब्ल्यूचे सर्व मुख्य अधिकारी हजर होते. मात्र  महापौर नंदा जिचकार, सत्तापक्ष नेता संदीप जोशी उपस्थित नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा होती.