हवामानाच्या अंदाजावर बळीराजाचे भवितव्य अवलंबून असते, हे माहीत असतानाही हवामान अभ्यासक, भारतीय हवामान खाते यांच्याकडून घाईघाईत व चुकीचे दिले जाणारे अंदाज बळीराजासाठी घातक ठरत आहेत. फेब्रुवारीच्या अखेरीस व मार्चच्या पहिल्या आठवडय़ात एका हवामान अभ्यासकाकडून चुकीचा अंदाज दिल्या गेल्याने नाशिकमध्ये द्राक्षांचे, तर विदर्भात संत्र्यांचे भाव पडले. वादळी पाऊस व गारपिटीच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांनी अतिशय कमी दरात द्राक्ष व संत्री विकली. हवामानाचे अंदाज असे वारंवार बदलत असतील, तर शेतकऱ्यांना खरे अंदाज कसे कळतील, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

तीन-चार वर्षांनंतर यावर्षी पहिल्यांदा फेब्रुवारीत स्थिर हवामानामुळे शेतकऱ्याला आराम मिळाला. त्यामुळे त्याला चांगल्या रब्बी उत्पादनाची अपेक्षा होती. कारण, गेल्या तीन-चार वर्षांत याच काळात वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे नुकसान होत होते. मात्र, फेब्रुवारीच्या अखेरीस हवामान अभ्यासक डॉ. राम साबळे यांनी राज्यातील बऱ्याच भागात सहा ते आठ मार्चदरम्यान वादळी पावसाचा अंदाज देऊन शेतकऱ्यांना इशारा दिला, पण राज्यात नेमका कोणत्या ठिकाणी पाऊस येईल, हे त्यांनी सांगितले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वस्त दरात संत्री विकली. त्यानंतर पाच ते सात मार्चदरम्यान राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी मुसळधार पाऊस पडेल, पण येथेही त्यांनी ठिकाणांचा उल्लेख केला नाही.

नाशिकसारख्या भागात गारपीट होईल आणि द्राक्षांचे नुकसान होईल, हे सांगितल्याने अनेक शेतकऱ्यांनी पडेल त्या किमतीत द्राक्षे विकली. त्यानंतर पुन्हा दोनच दिवसात राज्यात हवामान कोरडे राहील आणि केवळ पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे, असा हवामानाचा अंदाज वर्तवला. यावेळी मात्र त्यांनी कुठेही पिकाच्या संरक्षणाचा सल्ला दिला नाही. मात्र, साबळेंच्या हे अंदाज बहुतांशी खोटे ठरले आणि त्यांच्या अंदाजावर विश्वास ठेवणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

समुद्राचे तापमान आणि हवेच्या दाबावरून साबळेंने अतिशय घाईघाईने हे हवामानाचे अंदाज दिले. त्याचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसल्याने एकूणच हवामानाचे अंदाज देण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. अंदाज स्पष्ट नसताना आणि खूप सहजपणे आणि लवकर अंदाज देऊ नये. कारण, लोक हवामान अभ्यासक जे सांगतात, त्यावरूनच कृती करतात. विशेष म्हणजे, भारतीय हवामान खात्यानेही चंद्रपूर व नागपुरात पाऊस अपेक्षित नाही, असे सांगितले होते. याच खात्याने आधी पाऊस किंवा बर्फ पडेल, असे सांगितले.

कल अचुक अंदाज देण्याकडेच

हवामानात ज्या पद्धतीने बदल होतात त्यानुसार अंदाज द्यावे लागतात. २७ फेब्रुवारीला मी पहिला अंदाज दिला होता, पण पूर्व विदर्भात वारे परत गेले. यावेळी पहिल्या अंदाजाचा फायदा व्यापाऱ्यांनी घेतला आणि शेतकऱ्यांकडून कमी कि मतीत द्राक्ष खरेदी सुरू केली. मला हे कुणीतरी लक्षात आणून दिले. आपण दिलेल्या अंदाजाचे काय परिणाम होतील, हे अभ्यासकाच्या लक्षात येत नाही. त्यामुळेच आता अधिक अचुक अंदाज देण्याच्या दिशेने मी प्रयत्न करतो आहे.

डॉ. राम साबळे, ज्येष्ठ हवामान अभ्यासक

 

समुद्राचे तापमान व हवेच्या दाबावरून अंदाज अशक्य

एखाद्या सामान्य माणसाला हवामान अंदाजाचा इतका फटका बसणार नाही, जितका शेतकऱ्यांना बसतो. जगभरातील हवामानाचे अभ्यासक हे अंदाज द्यायला हवामानाच्या प्रतिकृती वापरतात, ज्यात भौतिकशास्त्र व गणिताचा उपयोग करून हवामानाची स्थिती सांगितली जाते. जगभरातील सवरेत्कृष्ट हवामान प्रतिकृती सध्या तीन ते पाच दिवसांच्या पलीकडचा अंदाज एकदम स्पष्ट आणि योग्य देत नाही. वादळी पाऊस असेल, तर आजपासून पुढील दोन दिवसांचा अंदाज योग्य दिला जातो. मात्र, पुढच्या सात ते दहा दिवसांनी वादळी पाऊस येणार, हे सांगणे शक्यच नाही. समुद्राचे तापमान आणि हवेचा दाब वापरून हवामानाचा अंदाज देता येत नाही. त्यात बरेच घटक असतात. वादळाला ऊर्जा, आद्र्रता लागते. त्याचा अंदाज समुद्राच्या तापमानावर सांगता येत नाही.

अक्षय देवरस, हवामान अभ्यासक, लंडन