अमरावती : महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा मंगळवारी ५ ऑगस्ट रोजी मुंबईच्या वरळी येथील एनएससीआय डोम येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये संगीत क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने ‘गजलनवाज’ भीमराव पांचाळे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांचे अमरावती जिल्ह्याशी अत्यंत जवळचे नाते आहे. अमरावती जिल्ह्यातील संगीतप्रेमींनी या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
अमरावती जिल्ह्यातील आष्टगाव हे ८०० लोकवस्तीचे खेडे म्हणजे भीमराव पांचाळे यांचे गाव. आई आणि वडिलांकडून तुकडोजी महाराजांची भजने आणि पारंपरिक ओव्या ऐकल्या होत्या. वडील भजन गायला खांद्यावर बसवून घेऊन जायचे. सातवीत गेल्यावर वडिलांनी अमरावतीला शिकायला पाठवले. भीमराव यांचे गाणे ऐकून कुणी तरी त्यांनी गाणे शिकावे, असे सुचवले आणि त्यातून शास्त्रीय संगीताचे पद्धतशीर शिक्षण झाले.
त्यांनी आपल्या गायनाने राज्यभर आणि देशभर खूप मान मिळवला. त्यांच्या कलेला मिळालेली हवी असलेली प्रतिष्ठा आणि त्यांचे गझल गायनाच्या क्षेत्रातील योगदान हे आजच्या पुरस्काराच्या रूपाने त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेणारे ठरले आहे. कविवर्य सुरेश भट यांच्या काव्याचा प्रभाव त्यांच्यावर शाळकरी वयातच झाला. त्यांच्यामुळेच पांचाळे मराठी गझलेकडे वळले. ‘जगत मी आलो असा की…’ही भटांची त्यांनी गायलेली अन् संगीतबद्ध केलेली पहिली गझल. सुरुवातीच्या काळात पु. ल. देशपांडे यांच्याकडून भरभरून कौतुक वाट्याला आले, त्यांनी एनसीपीएला कार्यक्रमही घडवून आणला. पुढे स्टेट बँकेत नोकरी लागली. आर्थिक स्थैर्य आले, पण नोकरीचे बंधन होते. पत्नी पाठीशी उभी राहिली आणि नोकरीचा राजीनामा देऊन ते गझलेसाठी मुक्त झाले. रेल्वेने प्रवास करीत त्यांनी कानाकोपऱ्यातील मराठी माणसापर्यंत गझल पोहोचवली.
भीमराव पांचाळे हे गझल गायनाच्या क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्व मानले जाते. त्यांच्या गायनाची शैली आणि गजल काव्याची व्याख्या या दोन्ही बाबींमध्ये ते एक अद्वितीय स्थान राखतात. त्यांनी भारतातच नाही, तर विदेशातही अनेक संगीत महोत्सवांमध्ये भाग घेतला असून, त्यांच्या गझल गायनाने लाखो श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. गझलेच्या प्रेमापोटीच त्यांनी अमरावतीत अनेक वर्षांपुर्वी गझल संमेलनाच्या आयोजनात पुढाकार घेतला होता. भीमराव पांचाळे यांनी गजल गायनाची एक नवी परिभाषा दिली आहे. त्यांचे गायन देशभरातील विविध संगीत प्रेमींमध्ये लोकप्रिय आहे.