केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यादीमध्ये उपराजधानीचा पहिल्या २० शहरांमध्ये ‘स्मार्ट सिटी’ म्हणून समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे या अपयशाचे खरे मानकरी कोण आहेत?, कुणाच्या चुकीमुळे शहराचा समावेश करण्यात आला नाही?, या विषयांवर गेल्या काही दिवसात आक्रमक आणि सभागृहात बहिष्कार टाकण्याची भूमिका घेणाऱ्या विरोधी पक्षाने मात्र मवाळ भूमिका घेत सत्तापक्षाशी संगनमत केले की काय अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
महापालिकेच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण महासभेच्या विषयपत्रिकेत विरोधी पक्ष नेते विकास ठाकरे यांचा ‘स्मार्ट सिटी’बाबत एक प्रश्न होता. त्यामुळे या विषयावर महापालिकेत गदारोळ होईल, अशी शक्यता वर्तवली जाणार होती. मात्र सभेच्या एक दिवस आधी सर्व गटनेत्यांच्या उपस्थितीत अजेंडामधील कुठल्या विषयावर चर्चा करायची आणि कुठल्या विषयावर नाही हे ईश्वरचिठ्ठीने ठरविण्यात आले आणि त्यात ‘स्मार्ट सिटी’चा विषय वगळण्यात आला.
ज्या प्रश्नावर काँग्रेसला सत्तापक्षाला धारेवर धरण्याची संधी आली होती तो प्रश्नच या सभेत घेण्यात आला नाही आणि तो निरस्त करण्यात आला. महापालिकेच्या एक वर्षांवर निवडणुका आल्या असताना सत्ता पक्षाला लक्ष्य करण्यासाठी विरोधक एकही संधी सोडत नसताना ‘स्मार्ट सिटी’च्या विषयावरून विरोधी पक्षाने अशी का भूमिका घेतली याबाबत महापालिका वर्तुळात आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा होऊ लागली.
खरे तर पहिल्या टप्प्यात उपराजधानीला ‘स्मार्ट सिटी’मधून वगळण्यात आल्यानंतर सत्ता पक्षाला लक्ष्य करण्यासाठी महाापालिकेत विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बसपच्या हाती आयते कोलीत मिळाले होते. या मुद्यावरून सत्तापक्षाच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या महिन्यात आक्रमक भूमिका घेत निदर्शने आणि धरणे आंदोलन केले.
गेल्या महिन्यात महापालिकेच्या सिव्हिल लाईनमधील कार्यालयासमोर धरणे प्रदर्शन आयोजित करून त्यात या विषयावरून जनआंदोलन करण्याची भूमिका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली होती. गेल्या महिन्यात झालेल्या महापालिकेच्या सभेत विकास ठाकरे यांनी ‘स्मार्ट सिटी’चा मुद्दा उपस्थित केला असताना त्या विषयावरून सभागृहात गदारोळ झाला होता.
जोपर्यंत अपयशाचे मानकरी कोण? हे जाहीर करणार नाही तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही, अशी भूमिका घेत काँग्रेसने सभेवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे नुकत्याच झालेल्या सभेत प्रश्नोत्तराच्या तासात विकास ठाकरे यांचा ‘स्मार्ट सिटी’च्या प्रश्नावर पुन्हा एकदा गदारोळ होईल, अशी शक्यता वतविण्यात आली असताना विरोधकांनी मात्र त्यावर मवाळ भूमिका घेतली आणि सभागृहात या विषयावर चर्चा करण्यात आली नाही.

‘ईश्वर चिठ्ठीवर चर्चा होणारच’
विरोधी पक्ष नेते विकास ठाकरे म्हणाले, सत्तापक्षाच्या विरोधात आम्ही नेहमीच आक्रमक असल्यामुळे नरमाईची भूमिका घेण्याचा प्रश्न नाही. सभेमध्ये दहा प्रश्न घेणार असल्याचे निश्चित झाले असताना त्यात ईश्वरचिठ्ठीने नेमका ‘स्मार्ट सिटी’चा प्रश्न बाहेर झाला. त्यामुळे आमच्यासमोर दुसरा पर्याय नाही. ‘स्मार्ट सिटी’बाबत सत्तापक्षाला जाब विचारला जाणार असून त्या भूमिकेवर आम्ही आजही ठाम असल्याचे ठाकरे म्हणाले.
महापौर प्रवीण दटके म्हणाले, महासभेत प्रश्नोत्तराच्या तासामध्ये १० पेक्षा अधिक प्रश्न घेता येणार नाही, असा नियम असल्यामुळे सभेच्या एक दिवस आधी सर्व गटनेत्यांच्या उपस्थितीत ईश्वरचिठ्ठीने प्रश्नांची निवड करण्यात आली आणि त्यात ‘स्मार्ट सिटी’ विषयाचा समावेश नव्हता. त्यामुळे ‘स्मार्ट सिटी’ या विषयावर चर्चा करणे अपेक्षित नव्हते. केवळ ‘स्मार्ट सिटी’चा विषय होता म्हणून त्याला टाळण्यात आले नाही. तो पुढच्या सभेत येऊन त्यावर चर्चा होऊ शकते, असेही दटके म्हणाले.