महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

शहरातील विविध भागात महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधण्यासाठी अर्थसंकल्पात कोटय़वधी रुपयांची तरतूद करण्यात आलेली असताना आणि गेल्या चार वषार्ंत स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असताना या प्रश्नाची महापालिका प्रशासनाने फारशी दखल घेतलेली नाही. अर्थसंकल्पात कोटय़वधी रुपयांची तरतूद करूनही प्रत्यक्षात हा पैसा जातो कुठे? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

महापालिकेच्या २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात स्थायी समिती अध्यक्ष सुधीर राऊत यांनी अनेक योजनांचा समावेश करून त्यासाठी कोटय़वधी रुपयांची आर्थिक तरतूद केली. शहरातील विविध भागात आणि बाजारपेठ परिसरात सार्वजानिक शौचालये आणि महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधण्यासाठी तरतूद करण्यात आली. गेल्या तीन वषार्ंत मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे.

राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर शहर झपाटय़ाने विकासाकडे वाटचाल करीत आहे. मात्र, शहरात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची संख्या फारच तोकडी असून महिलांना त्यासाठी त्रास सहन करावा लागतो. शहरात नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. विविध कामांसाठी महिला घराबाहेर पडतात. शहरात पुरुषांसाठी शौचालये आहेत, परंतु महिलांसाठी नाहीत. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नागपुरासाठी हे भूषणावह नाही. त्यामुळे सत्तापक्षाने त्यासाठी तीन कोटींची तरतूद केली होती. त्यात पहिल्या टप्प्यात महाराजबाग, सिरसपेठ आणि प्रजापतीनगर या भागात तीन स्वच्छतागृहे बांधण्यात येणार होती. कस्तुरचंद पार्क या ठिकाणी शौचालय उभारणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आला  होता. शिवाय जरिपटका भाजीबाजार, गांधीसागर तलाव, इतवारी, महाल, बालभवन, बडकस चौक, व्हेरायटी चौक, गोकुळपेठ बाजार, मेयो रुग्णालय परिसरात स्वच्छतागृहे बांधण्यात येणार होती. मात्र, यापैकी एकाही ठिकाणी अजूनही महिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्यात आलेले नाही.

रोटरी क्लबने यासंबंधीचा प्रस्ताव दिला होता. त्याला स्थायी समितीमध्ये मंजुरी देण्यात आली होती. रोटरीने १० पैकी ४ स्वच्छतागृहांची निर्मिती केली, मात्र ती ज्या ठिकाणी बांधण्यात आली आहेत त्या ठिकाणी महिलांना जाणे शक्य नाही अशी परिस्थिती आहे. शहरात ‘मिनी मेट्रो’सह अनेक मोठे प्रकल्प या शहरात येऊ घातले आहेत, मिहान प्रकल्पाला गती दिली जात आहे, या संपूर्ण पाश्र्वभूमीवर शहरामध्ये ज्याची आवश्यकता आहे, अशा व्यवस्थेकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे, ही बाब खेदजनक आहे.