बुलढाणा : घरातून बाहेर पडलेल्या युवकाचा शोध घेणाऱ्या कुटुंबाच्या हाती त्याला मृतदेहच आला. चिखली शहरातील सैलानी नगर परिसरात काल शुक्रवारी, १६ मे रोजी रात्री हा धक्कादायक घटनाक्रम घडला. युवकाने गळफास घेत आत्महत्या केली. यामुळे काल रात्री अनेक तास त्याचा शोध घेणारे नातेवाईक आणि मित्र परिवारासह

संपूर्ण सैलानी नगर परिसर हादरून गेला. नवाब शाह हारून शाह (वय २३ वर्षे, राहणार सैलानी नगर, चिखली, जिल्हा बुलढाणा) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. या युवकाने चिखली बुलढाणा राज्य मार्गावरील चव्हाण पेट्रोल पंपाजवळील एका झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याचे दिसून आले .

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नवाब शाह हा मूळचा सैलानी नगर, चिखली येथील रहिवासी होता. रोजच्याप्रमाणे गुरुवारी रात्री तो घरातून बाहेर पडला. मात्र बराच वेळ झाला तरी घरी परत न आल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. अखेर बुलढाणा मार्गावरील चव्हाण पेट्रोल पंपाजवळ त्याचा मृतदेह झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. नातेवाईक व अन्य नागरिकांनी तातडीने चिखली पोलीस ठाण्याला ही माहिती दिली. पोलीस कर्मचाऱ्यांनी घटना स्थळी धाव घेत पंचनामा केला. महिलांच्या रडण्याने वातावरण शोकाकुल झाले. नवाब शाह याने आत्महत्या का केली, याचे कारण समजू शकले नाही. यामुळे विविध तर्क वितर्क व्यक्त करण्यात येत आहेत. तसेच घातपाताची शंकाही व्यक्त होत आहे.