लोकसत्ता टीम

नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी प्रथमच मतदानाचा हक्क बजावण्यास इच्छुक असणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कर्तव्यासाठी साद घातली. त्यांला युवकांनी मोबाईलचा टॉर्च व डाव्या हाताचे बोट उंचावून सकारात्मक प्रतिसाद दिला.

जिल्हा निवडणूक कार्यालय, महानगरपालिका आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आज सुरेश भट सभागृहात युवा मतदार जागरुकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. विपीन इटनकर, सौम्या शर्मा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे, महापालिकेचे सहायक आयुक्त् महेश धामेचा, उपायुक्त मिलिंद मेश्राम यांच्यासह विद्यापीठाचे सिनेट सदस्य, व्यवस्थापन सदस्य उपस्थित होते.

आणखी वाचा-काँग्रेस नेते भाजपमध्ये का येतात? बावनकुळे यांनी स्पष्टच सांगितले…

डॉ. इटनकर म्हणाले, लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रथमच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सज्ज असणारे नागपूर जिल्ह्यातील नव मतदार हे मतदार जागरुकता कार्यक्रमाचे खरे अँबेसेडर आहेत. आपल्या कृतीशील सहभागातून ते आपले कुटुंब, कॉलनी, परिसरात मतदार जागरुकता घडवून आणतील.

ज्या महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने मतदान करतील त्या महाविद्यालयांना गौरविण्यात येईल, सौम्या शर्मा यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीतील मतदानाची संधी सोडू नका, असे आवाहन डॉ.प्रशांत बोकारे यांनी केले.

आणखी वाचा-नाराजीचे काय? खासदार भावना गवळी उमेदवारी नाकारल्यानंतर स्वगृही

खेलो इंडिया विद्यापीठ गेम्समध्ये रोप्य पदक पटकविणारी ॲथलिट्स नेहा ढबाले हीने प्रतिज्ञा दिली. मॅट्रीस वॉरियर्सच्यावतीने ‘एक वोटसे क्या फरक पडता है’ हे पथनाट्य सादर केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालये, एनएसएस,एनसीसी, विद्यापीठ क्रीडा प्राधिकरण, विद्यार्थी विकास कल्याण समितीचे विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.