अमरावती : जंगलात गुरांना चराईसाठी घेऊन गेलेल्या एका युवकावर वाघाने केलेल्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील कुलंगणा खुर्द या गावाजवळील जंगलात उघडकीस आली. आपल्या सहकाऱ्यावर वाघाने हल्ला केल्याचे कळताच दुसऱ्या युवकाने पळ काढून आपला जीव वाचवला. रात्रभर तो एका शेतात लपून होता. आज सकाळी तो गावी पोहचला.

प्रवीण सुखराम बेलसरे (१७, रा. कुलंगणा, ता. चिखलदरा) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मृत युवकाचे नाव आहे. त्याचा मित्र गोविंद गोपाळ कासदेकर (१७, रा. कुलंगणा, ता. चिखलदरा) हा या घटनेत बचावला आहे.हे दोघेही युवक चराईसाठी गुरांना घेऊन जंगलात गेले होते.  मोझरी येथे गुरांना नातेवाईकांकडे बांधून ठेवल्यानंतर ते काल श्रावणातील शेवटचा सोमवार असल्याने जंगलातील डोंगरावरील महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते. रात्री उशिरापर्यंत दोघेही न परतल्याने त्याचे कुटुंबीय चिंतेत होते. गावकऱ्यांनी दोघांचाही शोध सुरू केला होता.

दरम्यान, प्रवीण सुखराम बेलसरे याचा मृतदेह जंगलात आढळून  आला. त्याचा एक पाय तुटलेल्या स्थितीत होता.मंदिरातून दर्शन  करून परत येत असताना, अचानक पाऊस वाढल्याने नदीची पाण्याची पातळी वाढली आणि दोघेही नदीच्या काठावर थांबले. तोवर संध्याकाळ झाली. पाण्याची पातळी कमी होत असल्याचे पाहून दोन्ही मित्र अंधारात त्यांच्या गावाकडे जाऊ लागले, तेव्हा एका वाघाने प्रवीणवर मागून हल्ला केला, ते पाहून त्याचा मित्र गोविंद घाबरून तेथून पळून गेला आणि रात्रभर एका शेतात लपून राहिला. दुसऱ्या दिवशी गोविंद स्वतः आला आणि गावकऱ्यांना घटनाक्रम सांगितला.

गुरे चारल्यानंतर, आम्ही महादेवाचे दर्शन घेऊन परतत होतो, तेव्हा वाघाने माझ्या मित्रावर हल्ला केला, मी कसा तरी माझा जीव वाचवला आणि तेथून पळून गेलो, परंतु माझा मित्र पूर्णपणे वाघाच्या तावडीत होता. त्याला वाचवणे माझ्यासाठी शक्य नव्हते, म्हणून मी माझा जीव वाचवण्यासाठी पळून जाणेच योग्य मानले, असे गोविंद याने गावकऱ्यांना सांगितले. या घटनेने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

गेल्या जून महिन्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागाच्या हरीसाल वन परिक्षेत्रातंर्गत जंगलात इंधन आणण्यासाठी गेलेल्या एका ५५ वर्षीय आदिवासी गावकऱ्यावर वाघाने हल्ला करून त्याला ठार केले होते. गेल्या काही वर्षांमध्ये मेळघाटात वाघाच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे.