अकोला : अकोला जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या बार्शीटाकळी पं.स.मधील टाकळी (छबिले) गावातील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या अभिनयाने साकारलेल्या ‘गुरु द टीचर’ या लघुचित्रपटाची निवड ‘स्टुडंट वर्ल्ड इम्पॅक्ट फिल्म फेस्टिवल’ या अमेरिकेतील चित्रपट महोत्सवासाठी झाली आहे. ‘आम्ही आपल्या असामान्य प्रतिभेने प्रभावित झालो असून महोत्सवात आपली कलाकृती प्रदर्शित करण्यासाठी उत्सुक आहोत’, असे चित्रपट महोत्सवाच्या आयोजकांकडून दिग्दर्शकांना पत्र प्राप्त झाले.

अक्षरदीप कला अकादमी, जागर फाउंडेशन आणि ‘ओॲसिस मल्टिमिडिया’ची ही निर्मिती असून प्रा.संतोष हुशे, डॉ.नंदकिशोर चिपडे तसेच शिक्षण विभागाच्या सहकार्यातून निर्माण झालेल्या लघुचित्रपटाचे पटकथालेखन तथा दिग्दर्शन महेंद्र बोरकर यांनी केले आहे. किशोर बळींच्या ‘गुरु आयोनि लडका’ या कादंबरीतील एका प्रसंगावर आधारित पंधरा मिनिटांच्या या लघुचित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका तसेच गीतलेखनही केले आहे. प्रभात किड्सचा विद्यार्थी सृजन बळी तसेच स्कुल आॕफ स्कॉलर्सची विद्यार्थीनी पूर्वा बगळेकर या दोन विद्यार्थ्यांसह जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, टाकळी (छबिले) या शाळेचे २५ विद्यार्थी तसेच गावकऱ्यांनी अभिनय साकारला आहे.

हेही वाचा >>> अमरावती : डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रुग्णांचे हाल, वैद्यकीय अधिकाऱ्यांची पन्नास टक्के पदे रिक्त

डॉ. रमेश थोरात, सचिन गिरी, मेघा बुलबुले, पूर्वा बळी, राहुल सुरवाडे, ऐश्वर्या मेहरे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असून चित्रदिग्दर्शन आणि संकलन विश्वास साठे यांचे आहे. डॉ. कुणाल इंगळे यांनी संगीतबद्ध केलेली प्रार्थना गायिका वैशाली माडे यांनी गायली. संगीत संयोजन बंटी चहारे यांनी रंगभूषा प्रविण इंगळे यांनी केली आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील उत्कट भावबंधाचे दर्शन घडवणाऱ्या या लघुचित्रपटातून दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. कधी साधा कॕमेरादेखील न पाहिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिभेने ही किमया साधली. १२० देशातील १३ हजार प्रेक्षकांचा सहभाग असणाऱ्या ‘स्वीफ’ चित्रपट महोत्सवात प्रदर्शित होणाऱ्या निवडक चित्रपटांमध्ये ‘गुरु’ची वर्णी लागली आहे. अकोल्याचे नाव जागतिक पातळीवर नेणाऱ्या या कलाकृतीबद्दलचे औत्सुक्य वाढले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुठलेही व्यावसायिक प्रशिक्षण न घेतलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील मुलांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाणे हे खूप आशादायक आहे. प्रतिकूल परिस्थितीतून तळागाळातील प्रतिभा मुख्य प्रवाहात येणे ही इतरांसाठी प्रेरणादायक आहे. लवकरच यातील काही चेहरे मराठी चित्रपटात झळकतील, असा विश्वास वाटतो.– डॉ. महेंद्र बोरकर, दिग्दर्शक