27 May 2020

News Flash

मालेगावसाठी १० हजार किलो तांदूळ

स्वयंसेवक नोंदणी मोहीम सुरू

संग्रहित छायाचित्र

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या पुढाकाराने आणि अ‍ॅफकॉन्स या कंपनीच्या सहकार्याने मालेगावसाठी १० हजार किलो तांदळाचा पुरवठा करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून मालेगावसाठी ही मदत वाहनाव्दारे रवाना करण्यात आली.

आपत्कालीन प्रसंगी ज्या सेवाभावी संस्था मदतीसाठी पुढे येत आहेत, त्यांच्याशी समन्वय साधून मदत घेण्यात येत असल्याचे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मजूर, शेतमजूर तसेच ज्यांचे हातावर पोट आहे, अशा तळागाळातील लाभार्थ्यांसाठी सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून १० हजार किलो तांदुळ मालेगावकडे रवाना करतांना आनंद होत आहे. मालेगावच्या स्थानिक प्रशासनामार्फत नियोजनबध्द वितरण करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत ही मदत पोहचविली जाईल, असा विश्वास वाटतो. नागरिकांच्या मूलभूत अडचणी सोडविण्यास स्थानिक प्रशासन कटिबध्द असून मालेगाव तालुक्यात आजपर्यंत करोनाचा एकही रूग्ण आढळून आलेला नाही, ही समाधानाची बाब आहे. याचे श्रेय नागरिकांसह स्थानिक प्रशासनाला जाते. काही जण अजूनही अन्न आणि पाण्यासाठी घराबाहेर पडत असून नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे. नागरिकांनी अजून काही दिवस संयम बाळगण्याचे आणि प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, अ‍ॅफकॉन्स कंपनीचे शेखर दास आदी उपस्थित होते.

मालेगाव पालिकेतर्फे स्वयंसेवकांना आवाहन

करोना विषाणू मुक्तीसाठी स्वयंसेवकांची नोंदणी मोहीम मालेगाव महानगरपालिका प्रशासनाने सुरू केली आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने स्वयंसेवक म्हणून नोंदणीसाठी पुढे यावे, असे आवाहन पालिका आयुक्त किशोर बोर्डे यांनी केले आहे. डॉक्टरांव्यतिरिक्त, नर्सिग कर्मचारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, निमवैद्यकीय कर्मचारी आणि आरोग्य सेवेमध्ये काम करणारे कर्मचारी, आयुष डॉक्टर, एनसीसी, एनएसएस, एनवायके स्वयंसेवक, सेवानिवृत्त सैनिक, माजी सैनिक, पशुवैद्यकीय डॉक्टर, रेड क्रॉस, सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन, ग्रामपंचायत इतर स्थानिक संस्था यांचे कर्मचारी, निवासी कल्याण संघटना यांची सेवा स्वयंसेवक म्हणून वापरली जाऊ शकते. गरजेनुसार प्रत्येक प्रवर्गासाठी योग्य असे प्रशिक्षण दिले जाऊ शकते. मनपा स्तरावर उपायुक्त नितीन कापडणीस यांच्या नियंत्रणाखाली आणि उपायुक्त रोहिदास दोरकुळकर, सहाय्यक आयुक्त तुषार आहेर यांच्या व्यवस्थापनात करोना मुक्ती स्वयंसेवक स्त्रोतांची यादी तयार केली जात आहे. कोणाला नोंद करायची असल्यास ७६२०७४९९००,  ८९७५७१२३९५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त बोर्डे यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2020 12:15 am

Web Title: 10000 kg of rice for malegaon abn 97
Next Stories
1 प्रक्षोभक, आक्षेपार्ह संदेश, चित्रफितीला ‘अ‍ॅडमिन‘ जबाबदार
2 करोनाग्रस्ताच्या निवासस्थानाभोवतीचा तीन किलोमीटर परिसर प्रतिबंधित
3 Coronavirus outbreak  : माहिती दडविल्यास कारवाई
Just Now!
X