नाशिकमधील उंटवाडी येथील निरीक्षण गृहातील मुलाचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उंटवाडी रोड येथे विधी संघर्षित आणि अनाथ मुलांसाठी निरीक्षण गृह चालवले जाते. या निरीक्षण गृहात मुले आणि मुली राहतात. या मुलांना शिक्षणासाठी गंगापूर रोडमधील के बी एच विद्यालयात तर मुलींना रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयात पाठवले जाते. या निरीक्षण गृहातील शंकर गावित (१५) हा मुलगा बुधवारी शाळेत जाण्यासाठी निघाला होता. हनुमान मंदिरासमोरील उंटवाडी रोडवर अज्ञात व्यक्तीने शंकरचे अपहरण केले. बराच वेळ शंकर परत न आल्याने त्याचा शोध घेण्यात आला. उंटवाडीमधील त्याचे नातेवाईक आणि अन्य भागांमध्ये शंकरचा शोध घेण्यात आला. मात्र शंकर न सापडल्याने शेवटी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.