07 July 2020

News Flash

बाधितांशी संपर्क झालेल्यांचे अहवाल सकारात्मक

करोनाचा वेगाने फैलाव; शहरात २४ तासांत १५६ नवे रुग्ण

पंचवटीतील पेठरोडवर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून अडथळे उभारण्यात आले असले तरी नागरिक त्यामधूनही वाट काढून ये-जा करत आहेत.

करोनाचा वेगाने फैलाव; शहरात २४ तासांत १५६ नवे रुग्ण

नाशिक : शहरात २४ तासात १५६ रुग्ण आढळल्यानंतर गुरूवारी दुपापर्यंत नव्याने ५६ रुग्णांची भर पडली. दाट लोकवस्तीच्या भागात बाधितांच्या संपर्कात आलेल्या बहुतेकांचे अहवाल सकारात्मक येत आहेत. फुलेनगर, जुन्या नाशिकमधील काही विशिष्ट भागात समूह संसर्गाला सुरूवात झाल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिका घरोघरी तपासणीबरोबर वाढत्या रुग्णांवरील उपचारासाठी खासगी रुग्णालयांच्या मदतीने खाटांची संख्या विस्तारण्याची तयारी करत आहे.

शहरातील वेगवेगळ्या भागात करोनाचा वेगाने फैलाव होत आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार रुग्ण सापडलेले तब्बल १८० भाग सध्या प्रतिबंधित आहेत. यात दाट लोकवस्तीच्या फुलेनगर, जुने नाशिकमधील काझीपुरा, कुंभारवाडा, नाईकवाडी पुरा अशा काही भागात रुग्णांची संख्या अधिक आहे. या क्षेत्रातच समूह संसर्ग होत असल्याची भीती व्यक्त होत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यास दुजोरा दिला. काही विशिष्ट भागात बाधितांच्या संपर्कात आलेले अनेक जण सकारात्मक असल्याचे उघड होत आहे. लक्षणे असणारे आणि नसणारे अशा अनेकांना करोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. तापाच्या अनेक रुग्णांना करोना वगळता अन्य आजार आढळत नाही. यातून समूह संसर्गाचे संकेत मिळत असल्याचे सांगितले जाते. रविवारपासून मुख्य बाजारपेठेसह पंचवटी, सिडको, नाशिकरोड भागातील बहुतांश दुकाने व्यापाऱ्यांनी बंद ठेवली आहेत. तरीही या भागात विनाकारण येणाऱ्यांची संख्याही बऱ्यापैकी आहे. ज्या भागात मोठय़ा प्रमाणात रुग्ण सापडले, त्या प्रतिबंधित क्षेत्रात कठोरपणे अमलबजावणी झाली नाही. फुलेनगर, जुने नाशिकमधील काही प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांचे भटकणे सुरूच आहे. त्यामुळे ते परस्परांच्या संपर्कात येतात. ही बाब करोनाचा संसर्ग वाढविण्यास कारक ठरली आहे.

शहराची रूग्णसंख्येची आकडेवारी १६०० चा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर आहे. गुरूवारी दुपापर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात नव्याने ५६ रुग्ण आढळले. करोनामुळे आतापर्यंत ७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर उपचाराअंती ५८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. सध्या ९२३ रुग्ण उपचार घेत आहेत. प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या १८० पर्यंत गेली असून त्यात नवनवीन भागांची भर पडत आहे. महापालिकेतील १८ जण करोनाबाधित आढळले. त्यातील एकाचा मृत्यू झाला.  दाट लोकवस्तीच्या भागात घरोघरी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. शिवाय वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन खासगी रुग्णालयांच्या सहकार्याने खाटांची संख्या वाढविण्यात येत आहे. सरकारने महापालिकेतील रिक्त अतिरिक्त आयुक्त पदावर प्रवीण आष्टीकर, समीर उन्हाळे यांची नियुक्ती करून प्रशासनाला नवी कुमक दिली आहे.

दुपापर्यंत ८१ नवीन रुग्ण

नाशिक शहरासह ग्रामीण भागात करोनाचा आलेख उंचावत आहे. गुरूवारी दुपापर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात करोनाचे नवीन ८१ रुग्ण आढळले. यात शहरातील ५६ तर उर्वरित ग्रामीण भागातील आहेत. यात हरसूल, येवला, विंचूर, पिंपळगाव, म्हाळसाकोरे, सिन्नर, दिंडोरी, आहेरगाव येथील रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्य़ाची एकूण रुग्णसंख्या ३२३९ वर पोहचली आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १९२ वर गेली आहे. १७५४ रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून सध्या १२९३ रुग्ण उपचार घेत आहेत.

करोनाच्या भीतीमुळे आत्महत्या

करोनाच्या भीतीमुळे पेठरोडवरील तुळजा भवानी नगरात एका व्यक्तीने गळा चिरून आत्महत्या केली. अशोक दामोदर कालेवार (४६) असे या व्यक्तीचे नांव आहे. कालेवर हे गंभीर स्थितीत आपल्या घरात आढळले. कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतांना त्यांचे निधन झाले. काही दिवसांपासून करोनाच्या भीतीने ते अस्वस्थ होते. कुटुंबियांना आयुर्वेदीक काढे करून पाजत होते. त्यांच्या बोलण्यात करोनाची भीती व्यक्त होत असे. या भीतीतूनच त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2020 1:24 am

Web Title: 156 new covid 19 patients in the nashik city in 24 hours zws 70
Next Stories
1 ‘रमी’ मध्ये हरल्यानंतर ऑनलाइन फसवणूक झाल्याची तक्रार
2 नाशिकशी नाळ तुटल्याने मनमाडकरांच्या नोकऱ्याही धोक्यात
3 ..अन्यथा मंत्री, लोकप्रतिनिधींच्या दारात कांदे ओतणार
Just Now!
X