दहावीच्या निकालात उत्तीर्णतेत १६ टक्क्यांनी वाढ; नंदुरबार पिछाडीवर

करोनाच्या प्रादुर्भावामुळे विलंबाने जाहीर झालेल्या इयत्ता १०वीच्या निकालात नाशिक विभागीय मंडळाने राज्याच्या क्रमवारीत सातवा क्रमांक मिळवला. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल १६ टक्क्यांनी वाढ होऊन तो ९३.७३ टक्के लागला. जिल्हानिहाय विचार केल्यास उत्तीर्णतेत नाशिक आघाडीवर असून नंदुरबार पिछाडीवर आहे. उत्तीर्णतेच्या टक्केवारीत मुलींनी पुन्हा वर्चस्व राखले.

मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल बुधवारी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. निकालात लक्षणीय वाढ झाली आहे. करोना टाळेबंदीत शेवटचा भूगोलाचा पेपर रद्द केला गेला होता. या विषयाचे सरासरी गुण द्यावे लागले. निकालावर त्याचाही प्रभाव पडल्याचे दिसत आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी, पालक संगणक, भ्रमणध्वनीकडे डोळे लावून बसले होते. या परीक्षेला एकूण एक लाख ९७ हजार ९७६ विद्यार्थी बसले. त्यातील एक लाख ८५ हजार ५५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाचा जिल्हानिहाय विचार केल्यास नाशिक (९४.९३), धुळे (९४.५०), जळगाव (९३.५१), नंदुरबार (८८.१४) अशी टक्केवारी आहे. विभागात परीक्षा देणाऱ्या एकूण मुलांपैकी एक लाख ७१७ विद्यार्थी अर्थात ९२.३० टक्के उत्तीर्ण झाले. मुलींचे हेच प्रमाण ८४ हजार ८३८ असून टक्केवारी ९५.४७ इतकी आहे. विशेष प्रावीण्य आणि प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय वाढली आहे. विशेष प्रावीण्यप्राप्त ६७ हजार ४६७, प्रथम श्रेणीत ७१ हजार ३३४, द्वितीय श्रेणी ३८ हजार ९७९ तर पास श्रेणीत ७७६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गुण पडताळणी, उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतींसाठी गुरुवारपासून अर्ज करण्याची सोय करण्यात आली आहे. उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी प्रथम छायाप्रत घेणे अनिवार्य असून ही छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसांत मंडळाकडे अर्ज करणे आवश्यक राहणार आहे. याबाबतची माहिती मंडळाचे विभागीय अध्यक्ष कृष्णकुमार पाटील, विभागीय सचिव नितीन उपासनी यांनी दिली.

इयत्ता १०वीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर साधारणत: आठ ते दहा दिवसांत मूळ गुणपत्रिका शाळांमार्फत विद्यार्थ्यांना वितरित केल्या जातात. ऑनलाइन निकाल जाहीर करताना ही तारीख जाहीर केली जाते. यंदा करोना संकटामुळे ती तारीख जाहीर करण्याचे टाळले. यामुळे मूळ गुणपत्रिका कधी मिळणार याबद्दल विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संभ्रम आहे. ही तारीख निश्चित झाल्यानंतर जाहीर केली जाईल असे सांगण्यात आले.

कॉपीप्रकरणी ११८ विद्यार्थ्यांना शिक्षा

विभागात १२४ गैरमार्ग प्रकरणे निदर्शनास आली. त्यापैकी ११८ विद्यार्थ्यांवर मंडळाच्या नियमानुसार कारवाई करण्यात आली. यात नाशिकमध्ये २७, धुळे १३, जळगाव ३८, नंदुरबार ४० जणांचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या प्रकरणांमध्ये घट झाली आहे. गेल्या वर्षी २३६ प्रकरणे आढळली होती. त्यातील २२५ जणांना शिक्षा झाली.

अनुत्तीर्णतेच्या प्रमाणात घट

निकालाची टक्केवारी लक्षणीय वाढल्याने अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण घटले आहे. परीक्षेला बसलेल्या एक लाख ९७ हजार ९७६ पैकी एक लाख ८५ हजार ५५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. केवळ १२ हजार ४१९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. नेहमीच्या तुलनेत यंदा अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाणही घटले आहे

विषयवार टक्केवारी

मराठी प्रथम भाषा   ९४.८७

मराठी द्वितीय / तृतीय भाषा ९८.४९

उर्दू प्रथम भाषा ९४.३६

हिंदी प्रथम भाषा    ९५.८५

हिंदी द्वितीय / तृतीय भाषा ९३.३५

इंग्रजी प्रथम भाषा   ९९.४४

इंग्रजी द्वितीय / तृतीय भाषा ९४.१९

गणित ९६.२४

विज्ञान  ९६.५९

सामाजिकशास्त्रे ९९.९९