बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या १०९ वाहनांवर कारवाई

नाशिक : आपल्या गावी पायी निघालेल्या स्थलांतरीत मजुरांना महाराष्ट्राच्या सिमेपर्यंत मोफत पाठविण्याचा निर्णय झाल्यानंतर १० दिवसांत प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वायूवेग पथकांनी रात्रंदिवस काम करत आतापर्यंत दीड हजार बसमधून ३३ हजार २६४ इतक्या स्थलांतरीत मजुरांच्या प्रवासाची सुविधा उपलब्ध केली आहे. याच काळात मालवाहू वाहनांमधून धोकादायक प्रवासी वाहतूक करणाऱ्या १०९ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली.

याबाबतची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दिली. करोनाच्या टाळेबंदीत वेगवेगळ्या शहरांमध्ये काम करणारे मजूर, कामगार अडकून पडले. टाळेबंदीच्या पहिल्या तीन टप्प्यात प्रवासी वाहतुकीला परवानगी

मिळाली नाही. परिणामी, मुंबईसह आसपासच्या भागात अडकून पडलेले कामगार, मजुरांनी कुटुंबासह पायी मूळ गावाकडे कूच केले. सलग काही दिवस शेकडो मजूर नाशिकमधून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आदी राज्यात जाण्यासाठी पायी प्रवास करत होते. राज्य सरकारने या मजुरांना महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत एसटी बसने मोफत पाठविण्याचा निर्णय घेतला. नऊ मेच्या रात्री ही योजना कार्यान्वित झाली.

या दिवसापासून प्रादेशिक परिवहन विभागाच्या वायुवेग पथकांनी रस्त्यावर पायी जाणाऱ्या मजुरांना एकत्र करून त्यांना बसगाडय़ा उपलब्ध केल्या. इगतपुरी, घोटी, शहरातील विल्होळी, महामार्ग बस स्थानक,जत्रा हॉटेल, पिंपळगाव बसवंत टोलनाका, चांदवड, पेठ आणि इतर ठिकाणांहून पायी जाणाऱ्या मजुरांसाठी एसटी बस उपलब्ध करून देण्यात आल्या. बसमधून पाठविताना शारीरिक अंतराच्या निकषाचे पालन करण्यात आले. १० दिवसांत तब्बल १५०० एसटी बसगाडय़ांमधून ३३ हजार २६४ स्थलांतरीत मजुरांच्या मोफत प्रवासाची सोय करण्यात आल्याचे कळसकर यांनी सांगितले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल कदम, उमेश तायडे आदींच्या प्रयत्नामुळे हे काम यशस्वीपणे पार पडले.

बेकायदेशीर प्रवासी वाहतूक, १०९ वाहनांवर कारवाई

मजुरांसाठी ही व्यवस्था करताना दुसरीकडे वायुवेग पथके बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या मालवाहू मोटारींवर लक्ष ठेऊन होती. या काळात मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या १०९ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून तीन लाख १८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या वाहनांमधील स्थलांतरीत मजुरांना एसटी बसची व्यवस्था करून देण्यात आली.

नाशिकमधून ६९८ बसेस

नाशिक शहरातून स्थलांतरीत मजुरांसाठी २९९ बस सोडण्यात आल्या. त्यातून साडेसहा हजारहून अधिक मजुरांना राज्याच्या सिमेवर सोडण्यात आले. नाशिक ग्रामीणमधून एकूण ३९९ बसमधून आठ हजार ७७८ प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. कसारा, इगतपुरी, घोटी येथून पायी जाणाऱ्या मजुरांसाठी ठाण्यातून ८१४ बस सोडण्यात आल्या. त्यातून १७ हजारहून अधिक मजुरांची वाहतूक करण्यात आली.