नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग आला असून संमेलनात नाशिककरांचा सक्रिय सहभाग असावा यासाठी आयोजकांकडून ४० विविध समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. या माध्यमातून संमेलनाच्या कामांच्या जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात येऊन कामातही सुसूत्रता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

येथील गोखले शैक्षणिक संस्थेच्या आवारात ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या साहित्य संमेलनात राज्याबरोबरच देश-विदेशांतून साहित्यिक आणि मराठी भाषाप्रेमींची उपस्थिती राहणार असल्याने त्यांच्या सरबराईत कुठेही कमतरता राहू नये यासाठी आयोजकांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी विविध समित्या तयार करण्यात येणार असून या समित्यांमध्ये शहरातील विविध क्षेत्रातील प्रमुखांना स्थान देण्यात येणार आहे. त्यांच्याकडून संमेलन तयारीसाठी सक्रिय मदतीची आयोजकांना अपेक्षा आहे.

संमेलन यशस्वी होण्यासाठी सल्लागार मंडळासह ज्या काही समित्या स्थापन करण्यात येणार आहेत त्यात संयोजन आणि नियोजन, स्वागत, सत्कार, अतिथी, मदत कक्ष, निधी संकलन, कार्यालयीन कामकाज तसेच विविध शासकीय परवानगी, लेखा आणि परीक्षण, उद्घाटन आणि समारोप,  कार्यक्रम (काव्य वाचन व स्वागत),  कार्यक्रम (परिसंवाद), बालकुमार मेळावा, बोलीभाषा कविकट्टा,  गझल कट्टा, सांस्कृतिक कार्यक्रम, मंडप तसेच व्यासपीठ, प्रवेशद्वार दालन उभारणी, सभा मंडप समिती (व्यासपीठ सजावट, बैठक व्यवस्था), ध्वनी आणि प्रकाश योजना, भोजन, अल्पोपाहार, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि विद्युत व्यवस्था, निवास व्यवस्था, ग्रंथ प्रदर्शन आणि अन्य प्रदर्शने, साहित्य प्रकाशन (ग्रंथ प्रकाशन), परिवहन (वाहतूक) व्यवस्था, वाहनतळ, स्वयंसेवक निवड, देखरेख आणि कार्यशाळा, सुरक्षा व्यवस्था, प्रसिद्धी आणि माध्यम नियोजन (जनसंपर्क), स्मरणिका, संपादकीय आणि जाहिरात समिती, समाजमाध्यम, डिजिटल विपणन (संके तस्थळासह),  छायाचित्रणासह ध्वनिमुद्रण आणि चित्रीकरण, मुद्रण (छपाई), सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, ओळखपत्र, बिल्ले, फलक, शहर सुशोभीकरण, ग्रंथदिंडी,  वैद्यकीय मदत (आरोग्य), विधी, शिस्तपालन, चौकशी आणि तक्रार निवारण, आपत्कालीन नियोजन या समित्यांचा समावेश आहे.

समितीमध्ये काम करण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी त्यांचा संपूर्ण तपशील ९८२२८३०४६४, ९४२२२५६०४१, ९८५०९७०११४ क्र मांकांवर पाठवावा, असे आवाहन लोकहितवादी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

महापौरांकडून साहित्य संमेलन स्थळाची पाहणी

साहित्य संमेलन होणाऱ्या गोखले शैक्षणिक संस्थेच्या जागेची बुधवारी महापौर सतीश कुलकर्णी यांच्यासह पालिका सभागृहनेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील, गजानन शेलार, शाहू खैरे, नगरसेवक गुरुमीत बग्गा, समीर कांबळे, लोकहितवादी मंडळाचे जयप्रकाश जातेगावकर, शंकर बोऱ्हाडे, मुकुंद कुलकर्णी, सुभाष पाटील, देवदत्त जोशी, गिरीश नातू, विश्वास ठाकूर आदींनी पाहणी केली. या वेळी महापौरांनी संमेलनासाठी महानगरपालिकेच्या वतीने सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वस्त करण्यात आले. दरम्यान, लोकहितवादी मंडळाच्या वतीने मविप्र समाजाच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांची भेट घेण्यात आली. या भेटीत पवार यांनी संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करणे आवश्यक असून मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संमेलनाला बळ देईल, असे सांगितले. या वेळी संयोजन समितीचे जयप्रकाश जातेगावकर, सुभाष पाटील, प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर उपस्थित होते. संमेलनासाठी लागणारे मनुष्यबळ आणि भौतिक सुविधा संस्थेच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जातील आणि संस्थेचे काही प्रतिनिधी या संमेलनाच्या संयोजन समितीत सहभागी होतील, असे आश्वासन पवार यांनी दिले.