बारावी मराठीची प्रश्नपत्रिका सोडविताना नाशिक विभागातून ४३ कॉपीबहाद्दर ताब्यात

मराठी भाषा दिन जवळ येत असताना आणि तिला अभिजात दर्जा मिळण्यासाठी गेली अनेक वर्षे कंबर कसणाऱ्यांच्या प्रयत्नांना पूर्ण होण्यास थोडाच अवकाश असताना या विद्यार्थ्यांची या विषयातील भीती दूर होण्याऐवजी वाढतच चालली असल्याचे दिसून येत आहे.  मातृभाषेच्या या विषयात कॉपी करणाऱ्या मुलांची संख्या दरवर्षी वाढत असून यंदा मराठी विषयाची प्रश्नपत्रिका सोडविताना नाशिक विभागात ४३ कॉपीबहाद्दरांना पकडण्यात आले. नाशिक आणि धुळे शहरांत ही संख्या शून्यावर असली तरी ग्रामीण भागात कॉपीचा सुळसुळाट कायम असल्याचेच दिसून येत आहे.

शिक्षण मंडळाने भय-तणावमुक्त परीक्षा, कॉपीमुक्त परीक्षा असे विविध उपक्रम हाती घेत निर्भीड व पारदर्शी वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यासाठी भरारी पथक, स्थानिक पातळीवर दक्षता समिती, केंद्रप्रमुखांना विश्वासात घेत परीक्षा काळातील अलिखित  संहितेच्या सूचनाही दिल्या. प्रत्यक्षात मात्र इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेपासून कॉपीची सुरू असलेली परंपरा मातृभाषा असलेल्या मराठीच्या प्रश्नपत्रिका सोडवितानाही कायम राहिली. नाशिक विभागात कॉपी करताना ४३ जणांना भरारी पथकाने पकडले. यात धुळे जिल्ह्य़ात २१, तर जळगाव जिल्ह्य़ातील २२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

दरम्यान, शिक्षण विभागाशी यासंदर्भात संपर्क साधला असता माहिती अधिकारांतर्गत दाखल असलेल्या काही प्रकरणांवर विभागीय चौकशी असल्याने भरारी पथकासह मंडळाचे पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते, अशी माहिती देण्यात आली. भरारी पथक सर्वत्र लक्ष देऊ शकत नसल्याने दक्षता समितीने हे प्रकार हाताळावेत, अशी सूचना विभागीय अधिकारी रमेश मारवाडी यांनी केली आहे.

झाले काय?

* नाशिक जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात काही संवेदनशील परीक्षा केंद्रांबाहेर परीक्षार्थीचे नातेवाईक, मित्रपरिवाराचा वावर राहिला. सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथील केंद्रात मराठीची प्रश्नपत्रिका सोडविताना अनेकांना कॉपीचा आधार घ्यावा लागला.

* शाळेच्या संरक्षक भिंतींवरून उडय़ा मारत कॉपी पुरविण्यासाठी काही मंडळी थेट वर्गात पोहोचली. परीक्षा काळात पाणी देणारी लहान मुलेच पाण्याऐवजी परीक्षार्थीला कॉपी देत असल्याचे आढळून आले.

* वणी-सापुतारा महामार्गावर हे केंद्र येत असल्याने हा प्रकार वणी-सापुतारा मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांच्या लक्षात आला. त्यांनीही कॉपी देणाऱ्या- घेणाऱ्यांची धावपळ आपल्या भ्रमणध्वनीत बंदिस्त करत पुढे मार्गक्रमण केले.