जिल्ह्य़ात करोनाचे नवीन ४४ रुग्ण आढळले असून यात नाशिकचे १८, मालेगावचे २२ आणि ग्रामीण भागातील तीन जणांचा समावेश आहे. एक रुग्ण सोलापूरचा आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ५६५ वर पोहचली आहे. नाशिक शहरातील बहुतांश बाधित रुग्ण हे आधीच्या सकारात्मक रुग्णांच्या निकट संपर्कातील आहेत. सातपूर, चुंचाळे परिसरातील एकाच कुटुंबातील दोन वर्षांच्या बालिकेसह नऊ जण बाधित झाले. दिंडोरी तालुक्यातही करोनाने शिरकाव केला आहे.

जिल्ह्य़ातील प्रलंबित अहवालांपैकी ४२० आणि नवीन ११० अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले. त्यात ४८४ जणांचे अहवाल नकारात्मक, तर ४४ जणांचे अहवाल सकारात्मक आले. आधीच्या बाधित दोन रुग्णांचे अहवाल सकारात्मक आले. काही दिवसांपूर्वी मालेगाव येथे अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या सातपूर कॉलनीतील महिलेला करोनाची लागण झाली होती. तिच्या निकट संपर्कात आलेले कुटुंबातील पाच आणि चार नातेवाईक अशा एकूण नऊ जणांना करोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे उघड झाले. संबंधित एकत्रितपणे मोटारीतून मालेगाव येथे गेले होते. महिलेच्या संपर्कातील दोन भाडेकरू आणि सातपूर येथील किराणा व्यावसायिकाचा अहवालही सकारात्मक आहे.

हिरावाडीतील महिला रुग्ण बाधित पतीच्या संपर्कातील आहे. या महिलेचा पती मालेगाव पोलीस दलात कार्यरत आहे. त्याच्या संपर्कात आल्याने पत्नी बाधित झाली. पाथर्डी फाटा येथील मालपाणी सॅफ्रॉन इमारतीतील औषध विक्रेत्याच्या संपर्कात आल्याने ६५ वर्षांची महिला बाधित झाली. सिडकोतील एक पुरूष तर खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत पाटीलनगर येथील परिचारिका बाधित आहे.

पंचवटीतील धात्रक फाटा येथील ३५ वर्षांचा पुरूष, कोणार्क नगरातील ५१ वर्षांची व्यक्ती आणि इंदिरानगरातील ६२ वर्षांचा पुरूष, तर तारवालानगरातील ६६ वर्षांची महिला बाधित निघाली. सातपूर कॉलनी, मालपाणी सॅफ्रॉन आणि हिरावाडीतील परिसर आधीच प्रतिबंधित आहे. पाटीलनगर, जाधव संकुल आणि अन्य नव्या रुग्णाचा निवासी भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला जाणार असल्याचे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिता साळुंखे यांनी सांगितले.

ग्रामीण भागातही करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. नव्याने प्राप्त झालेल्या अहवालात विंचुरच्या सिध्दार्थनगरातील महिला, दिंडोरीतील इंदोरे येथील ४३ वर्षांची व्यक्ती आणि विंचूर येथील १९ वर्षांच्या युवकाचा अहवाल सकारात्मक आला. मालेगाव शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. नव्याने २२ जणांचे अहवाल सकारात्मक आले. यामध्ये दीड वर्षांची बालिका, सहा वर्षांचा मुलगा यासह तीन महिला आणि उर्वरित पुरूषांचा समावेश आहे. मालेगावच्या सोयगाव परिसरातील ३९ वर्षांचा पुरूष बाधित निघाला.

४६ रुग्ण करोनामुक्त, १९ जणांचा मृत्यू

जिल्ह्य़ात मालेगावपाठोपाठ ग्रामीण भागासह नाशिक शहरातही करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत मालेगावमध्ये ४४२, नाशिकमध्ये ५७ आणि नाशिक ग्रामीण ६० आणि अन्य जिल्ह्य़ातील १९ असे करोनाबाधित रुग्ण आढळलेले आहेत. एकूण रुग्णांचा आकडा ५६५ वर पोहचला आहे. यातील ४६ रुग्ण पूर्ण बरे होऊन करोनामुक्त झाले. तर आतापर्यंत १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४५६ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.