आजतागायत २१ हजार रुग्ण करोनामुक्त

नाशिक : जिल्ह्य़ात करोनाबाधितांची संख्या २६ हजारांचा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर असताना दुसरीकडे या आजाराने मृत्यू झालेल्यांची संख्या ७१३ वर पोहोचली आहे. बुधवारी शहरातील एका तरुण पत्रकाराचा करोनामुळे मृत्यू झाला. आरोग्य विभागाने आतापर्यंत २०  हजार ८४६  रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना सोडण्यात आल्याचे म्हटले आहे. सध्या चार हजार ३५१ रुग्ण उपचार घेत आहेत.

शहर आणि ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आलेला नाही. जलद तपासणी चाचण्यांद्वारे रुग्ण शोधले जात आहे. महापालिका क्षेत्रात प्रतिदिन ४०० ते ५०० रुग्ण आढळतात. ग्रामीण भागात या आजाराचा फैलाव होत आहे.

प्रारंभी करोनाचा कहर अनुभवणाऱ्या मालेगावमध्ये नियंत्रणात आलेली स्थिती रुग्ण वाढल्याने हाताबाहेर जात आहे. या एकंदर परिस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी जिल्ह्य़ात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या २८२ने कमी झाल्याचे सांगितले. सद्य:स्थितीत जिल्ह्य़ात चार हजार ३५१ रुग्ण उपचार घेत आहेत. ग्रामीणमध्ये नाशिक तालुक्यात २७९, चांदवड ५४ , सिन्नर २३१, दिंडोरी ५३, निफाड २४१, देवळा ७०, नांदगांव १४२, येवला २४, त्र्यंबकेश्वर १९, सुरगाणा १०, पेठ  २, कळवण १०,  बागलाण ८०, इगतपुरी ४३, मालेगाव ग्रामीण ११८ असे एकूण  १३७६ रुग्ण उपचार घेत आहेत. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात उपचार घेणारे दोन हजार ३४९, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात ६१७  तर जिल्ह्याबाहेरील ०९ रुग्ण उपचार घेत आहेत.

करोनामुळे आतापर्यंत ७१३ जणांचा मृत्यू झाला. यात नाशिक ग्रामीणमध्ये १९०, नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ४०५, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात ९७ आणि जिल्ह्य़ाबाहेरील २१ रुग्णांचा समावेश आहे.  जिल्ह्य़ाची रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ८०.४६ टक्क्यांवर पोहोचली आहे. नाशिक ग्रामीणमध्ये ७४.८२,  टक्के, नाशिक शहरात ८४.१९, मालेगाव ६५.६४  टक्के तर जिल्हा बाह्य़ रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८४.३८  टक्के आहे.

पत्रकाराचा मृत्यू

इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील एका पत्रकाराचा करोनामुळे मृत्यू झाला. पाथर्डी फाटा येथील खासगी रुग्णालयात ते उपचार घेत होते. याआधी त्यांनी विविध दैनिकात काम केले आहे. करोनाचे वृत्तांकनही ते करत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, बहीण, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.