७९३ पदे रिक्त; रुग्णसेवेवर विपरित परिणाम

स्वाइन फ्लू व तत्सम आजारांमुळे सर्वसामान्य धास्तावले असताना सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची धुरा सांभाळणारी यंत्रणा रिक्त पदांअभावी दोलायमान अवस्थेत पोहोचल्याचे चित्र आहे. तब्बल ७९३ पदे सद्य:स्थितीत रिक्त असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अहवालावरून समोर आली आहे. दुसरीकडे उपलब्ध मनुष्यबळावर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याने  त्याचा विपरित परिणाम रुग्णसेवेवर होत आहे.

उन्हाळ्याच्या हंगामात स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होते, असा अनुभव आहे.  या आजाराने या वर्षी जवळपास दहा जणांना प्राण गमवावे लागले. या रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ झाल्याचे दिसते. कोणत्याही आजारावर उपचाराकरिता गोरगरिबांसमोर शासकीय रुग्णालये हा एकमेव पर्याय असतो. आरोग्य विभागाची स्थिती जागा भरल्या जात नसल्याने घायकुतीला आल्यासारखी झाली आहे.

आरोग्य विभागाच्या अहवालावरून मंजूर पदांपैकी २० ते ३० टक्के पदे रिक्त असल्याचे दिसून येते. नाशिक मंडळात नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार व अहमदनगर जिल्हय़ाचा अंतर्भाव होतो.

डॉक्टरांप्रमाणे रुग्णालय व्यवस्थापन आणि विविध विभागांचे काम सांभाळणाऱ्या गट कमधील पदांची स्थिती आहे. वरिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, क्ष-किरण तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ अशा एकूण ३७ वेगवेगळी २३८० पदांना मान्यता आहे. त्यातील १९६६ पदे भरली असून ४१४ पदे रिक्त आहेत. म्हणजे ज्यांच्या जबाबदारीवर रुग्णसेवा चालणार आहे, तिचा पाया कमकुवत झाला आहे. पदोन्नतीसाठीच्या मंजूर ५१३ पदांपैकी ४७१ पदे भरलेली आहेत. उर्वरित ९६ पदे रिक्त आहेत. या एकंदर स्थितीमुळे रुग्णांना योग्य पद्धतीने सेवा देण्यावरही मर्यादा येत आहेत. दुसरीकडे रुग्णावर योग्य पद्धतीने उपचार न झाल्यास नातेवाईकांच्या रोषाला वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना तोंड द्यावे लागले.

आरोग्य विभागाच्या अहवालातील माहिती

वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ अर्थात वर्ग एकसाठी मंजूर २३२ पदांपैकी १५१ पदे रिक्त आहेत. त्यात शल्य चिकित्सकांची (नाशिक)मधील ३९, धुळे १०, नंदुरबार २४, जळगावमधील ३२ तर नगरमधील २६ पदे रिक्त आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारीच्या रिक्त १४ जागांचाही त्यात अंतर्भाव आहे. नाशिकमध्ये शल्य चिकित्सकांची ६८ पदे मंजूर असून केवळ २९ भरलेली आहेत. धुळ्यात १२ पदे मंजूर असली तरी केवळ दोन पदे तर जळगावमध्ये ३९ मंजूर असून केवळ नऊ पदांवर चिकित्सक आहेत. नंदुरबारमध्ये यापेक्षा वेगळी स्थिती नाही. वर्ग दोन संवर्गातील अर्थात वैद्यकीय अधिकाऱ्यांची तीच आकडेवारी दिसते. नाशिक मंडळात वैद्यकीय अधिकारी (वर्ग दोन) एकूण १२७९ पदे मंजूर आहेत. त्यातील स्थायी, बंधपत्रित व अस्थायी अशी एकूण ११८४ पदे भरण्यात आली आहेत. उर्वरित ९५ वैद्यकीय पदे रिक्त आहेत. त्यात नाशिक जिल्ह्यत १५, धुळे १६, जळगाव ३३ आणि नंदुरबारमधील २४ पदांचा अंतर्भाव आहे. या शिवाय वैद्यकीय अधिकारी वर्ग (ब) संवर्गातील ३७ पदे रिक्त आहेत. परिमंडळात २५१ पदे मंजूर आहेत. त्यातील २१४ भरली गेली असून उर्वरित रिक्त असल्याचे आरोग्य विभागाचा अहवाल सांगतो.