महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या बदलीची चर्चा शहरात सुरू असल्याने संभाव्य बदलीला विरोध करण्यासाठी सोमवारी आप पक्षाच्या वतीने पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या वेळी आंदोलनकर्त्यांनी पालकमंत्र्यांच्या प्रतिनिधींना निवेदन दिले.
सिंहस्थ कुंभमेळा नियोजनासाठी मुख्यमंत्र्यांनी महापालिकेचे आयुक्त म्हणून डॉ. गेडाम यांना आणले. सिंहस्थात पालिका आयुक्तांनी सर्व कामाचे नेटके नियोजन केले. त्या वेळी प्रभागातील कामे रखडल्याची ओरड झाली, परंतु सिंहस्थ झाल्यानंतर त्याकडे त्यांनी लक्ष दिले. महापालिकेच्या एकंदर कामात शिस्त आणण्यात डॉ. गेडाम यांनी महत्त्वाची भूमिका निभावली, परंतु शहरात लागू करण्यात आलेली पाणी कपात आणि बांधकाम व्यावसायिकांशी संबंधित कपाट प्रकरणामुळे राज्यातील सत्ताधारी भाजप नाराज असल्याचे सांगितले जाते. यामुळे स्थानिक आमदारांकडून डॉ. गेडाम यांना बदलण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे म्हटले जात आहे. या पाश्र्वभूमीवर आप पक्षाने आंदोलन करत जनमानसात स्वच्छ प्रतिमा असणारे डॉ. गेडाम यांची १८ महिन्यांत बदली का केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला. अशोक खेमका या अधिकाऱ्याची ज्या पद्धतीने बदली झाली, त्याच धर्तीवर भ्रष्टाचाराविरुद्ध लढणाऱ्या डॉ. गेडाम यांची बदली केली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. निवडून आलेले लोकप्रतिनिधी स्वत: काम करत नाहीत आणि अधिकाऱ्यांनाही करू देत नाही. आर्थिक शिस्त लावणारे अधिकारी मुळात कमी असताना डॉ. गेडाम यांची बदली त्वरित रद्द करण्याची मागणी आपने निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी जितेंद्र भावे, जगबीर सिंग, स्वप्निल घिया आदी उपस्थित होते.