विभागीय स्तरावर यंत्रणा ढेपाळलेलीच

नाशिक : करोनासंबंधीच्या नियमावलीची कठोरपणे अमलबजावणी व्हावी, यासाठी खुद्द महापालिका आयुक्त कैलास जाधव आघाडीवर असताना दुसरीकडे महापालिकेचे इतर अधिकारी आणि विभागीय अधिकाऱ्यांकडून त्या त्या विभागात प्रभावीपणे कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. आयुक्त जिथे अकस्मात भेट देतील, तिथे कारवाई होते. म्हणजे उपरोक्त ठिकाणांकडे विभागीय स्तरावरून लक्ष देण्यात आले नव्हते.  सिडकोतील कारवाईवरून हे पुन्हा उघड झाले आहे. नियमांच्या अमलबजावणीला व्यापक स्वरूप देण्यात विभागीय स्तरावरील ढेपाळलेली यंत्रणा अडथळा ठरल्याचे चित्र आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रसाराचा वेग लक्षणीय वाढला आहे. शहरात अंशत: टाळेबंदी लागू करत विनाकारण गर्दी होऊ नये, यावर भर दिला जात आहे. हॉटेल, जीवनावश्यक वस्तुंची दुकाने आणि बाजारपेठेत नियमांची अमलबजावणी व्हावी, यासाठी आयुक्त जाधव हे स्वत: रस्त्यावर उतरले आहेत. आदल्या दिवशी कॉलेजरोड, गंगापूर रस्त्यावरील हॉटेलच्या तपासणीनंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा मोर्चा नवीन सिडको भागाकडे वळला. परिसरातील हॉटेल, भाजी मार्केट, औषध दुकानांना अकस्मात भेट देण्यात आली. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. लेखानगर येथील स्पेन्स, उत्तमहिरा चावडी आणि सचिन या तीन हॉटेल चालकांकडून प्रत्येकी पाच हजार असा एकूण १५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. या हॉटेलमध्ये सुरक्षित अंतराचे पालन केले जात नव्हते.

शिवाजी चौक, लेखा नगर, राणे नगर परिसरातील भाजी बाजाराची पाहणी करण्यात आली. मुखपट्टी परिधान न करणाऱ्या ३० जणांवर कारवाई करण्यात आली. औषध विक्रेते, व्यावसायिकांशी चर्चा करून ताप, थंडी सारख्या आजारांबाबतची औषधे रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विक्री न करण्याची सूचना आयुक्त जाधव यांनी दिली. यावेळी घनकचरा व्यवस्थापन संचालिका डॉ. कल्पना कुटे, विभागीय अधिकारी मयूर पाटील, अंबड पोलीस ठाण्याचे निरीक्षक निंबाळकर आदी उपस्थित होते.

पालिका आयुक्त ज्या भागात अकस्मात भेट देतात, तिथे अनेक ठिकाणी नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून येते. आयुक्त गेल्यानंतर जी कारवाई होते, तशी कारवाई खरेतर आधीच होणे अपेक्षित आहे. परंतु, ढेपाळलेल्या पालिका यंत्रणेकडून तशी कारवाई होत नसल्याचे आयुक्तांच्या अकस्मात भेटीत उघड होत आहे. मध्यंतरी रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे पालिकेची यंत्रणा ढेपाळली होती. प्रतिबंधित क्षेत्राचे फलक, बाधित रुग्ण याकडे कुणाचे लक्ष नव्हते. यंत्रणेला कार्यप्रवण करण्यासाठी आयुक्त मैदानात उतरले असले तरी विभागीय पातळीवर व्यापक स्वरूप मिळालेले नाही.

प्रभावी उपायांचा विचार दूर

गेल्यावर्षी रुग्ण संख्या वाढली तेव्हां एकाच ठिकाणी भरणाऱ्या भाजीबाजारातील गर्दी रोखण्यासाठी कॉलनी वा प्रमुख चौकांपर्यंत बाजार विस्तारले गेले होते. त्यामुळे घराजवळ भाजीपाला उपलब्ध होऊ लागला. जिवनावश्यक आणि अन्य दुकानांमध्ये ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर राखले जाईल, यासाठी चिन्हांकनाचे काम झाले. सद्यस्थितीत तसे कुठेही आढळत नाही. शहरातील अनेक भागात काही विशिष्ट ठिकाणी भरणाऱ्या भाजी बाजारात गर्दी आहे. हॉटेलमध्ये ५० टक्के क्षमतेचा निकष पाळला जात नाही. तिथे कोणी तपासणीला फिरकत नाही. मुखपट्टीविना कित्येक जण भ्रमंती करतात. संबंधितांविरुध्द कारवाई करण्यात पालिकेची पथके कमी पडल्याची भावना नागरिकांमधून उमटत आहे.