मार्च महिन्यात येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ हे करोनाबाधित झाल्यामुळे संमेलनाच्या तयारीवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. रविवारी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि स्वागत समिती यांची बैठक झाली होती. दुसऱ्याच दिवशी भुजबळांचा अहवाल सकारात्मक आल्यामुळे महामंडळाचे पदाधिकारी गृह विलगीकरणात असून पुढील एक-दोन दिवसांत ते चाचणी करणार आहेत. संमेलनाबाबत लगेच पुनर्विचार न करता पुढील काळात स्थितीचे अवलोकन करण्याचे महामंडळाने ठरवले आहे. संमेलनाच्या तयारीसाठी दैनंदिन प्रत्यक्ष होणाऱ्या विविध समित्यांच्या बैठका आता दृकश्राव्य (ऑनलाईन) स्वरुपात होणार आहेत.

शहरातील गोखले शिक्षण संस्थेच्या प्रांगणात २६ ते २८ मार्च या कालावधीत होणाऱ्या संमेलनाच्या तयारीत करोनाच्या उंचावणाऱ्या आलेखाने अडचणींमध्ये भर पडत आहे. स्वागताध्यक्ष छगन भुजबळ आणि साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महामंडळ, स्वागत समितीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. करोना संकटामुळे साहित्य संमेलनात विशेष दक्षता घेण्याचे निश्चित झाले. गर्दी नियंत्रित करण्याऐवजी आलेले साहित्यप्रेमी सुरक्षित घरी कसे जातील, यासाठी प्रयत्न करण्याचे जाहीर झाले होते. या बैठकीनंतर काही तासात स्वागताध्यक्षांचा अहवाल सकारात्मक आल्यामुळे महामंडळाचे पदाधिकारीही धास्तावले आहेत. बैठकीस ठाले-पाटील यांच्यासह महामंडळाचे कार्यवाह दादा गोरे, कोषाध्यक्ष रामचंद्र काळोखे, सुनिता राजेपवार, के. एस. अतकरे उपस्थित होते. सध्या आपण गृहविलगीकरणात असून पुढील एक-दोन दिवसात स्वत:सह इतर पदाधिकाऱ्यांना चाचणी करण्याचा सल्ला देणार असल्याचे कौतिकराव ठाले पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

संमेलनास केवळ महिनाभराचा अवधी आहे. करोना काळात कराव्या लागणाऱ्या उपायांमुळे संमेलनाचे अंदाजपत्रक साडेचार ते पाच कोटीच्या घरात जाण्याच्या मार्गावर आहे. निधी संकलन, संमेलन स्थळावरील नियोजन आदींसाठी भुजबळ यांनी पुढाकार घेतला होता. प्रशासन, महापालिका, पोलीस, महावितरण यांची संयुक्त समिती नेमून संमेलनातील प्रत्येक विभागांशी संबंधित कामे जलदपणे होतील, याची तजविज केली होती. परंतु, आता ते करोनाबाधित झाल्याने निधी संकलनासह इतर तयारीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर यांनी मात्र तशी शक्यता नसल्याचे सांगितले. संमेलनाच्या कामांचे वाटप आधीच झाले असून तयारी सुरळीत सुरू आहे. संमेलनाच्या नियोजनासाठी स्थापित ३९ समित्यांच्या बैठकांमध्ये मुखपट्टी, सुरक्षित अंतराचे पालन केले जाते. महाविद्यालयातील वर्गात त्या पार पडतात. आता या बैठका प्रत्यक्ष घेण्याऐवजी दृकश्राव्य माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जातेगावकर यांनी नमूद केले.

भुजबळांच्या संपर्कातील यादी मोठी

* करोनाचा अहवाल सकारात्मक आल्याची माहिती खुद्द छगन भुजबळ यांनी सोमवारी सकाळी दिली. मागील दोन, तीन दिवसात आपल्या संपर्कात आलेल्यांनी करोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही केले.

* आपली प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुखपट्टीचा नियमितपणे वापर करणाऱ्या भुजबळ यांना करोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अनेकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. मागील दोन, तीन दिवसात ते अनेकांच्या संपर्कात आले होते.

* रविवारी राष्ट्रवादीच्या आमदार सरोज आहिरे यांच्या विवाह सोहळ्याला राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यासमवेत ते उपस्थित होते. दुपारी साहित्य संमेलनाच्या बैठकीनंतर भुजबळ यांनी करोनाची आढावा बैठक घेतली होती.

* यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. तत्पुर्वी शिवजयंतीला अनेक मंडळांच्या कार्यक्रमास ते उपस्थित होते.

साहित्य संमेलनाच्या तयारीवर काहीअंशी परिणाम होईल. संमेलनाबाबत लगेच पुनर्विचार होणार नाही. राज्यातील करोना स्थितीवर भुजबळ यांच्यासह आम्ही लक्ष ठेवून आहोत. स्वागताध्यक्ष बाधित झाले म्हणजे परिस्थिती बिघडली असे होत नाही. करोनाचा प्रादुर्भाव किती वाढतोय हे पाहून पुढे चर्चा केली जाईल. तशीच वेळ आली तर पुनर्विचार केला जाईल.

– कौतिकराव ठाले-पाटील (अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ)