जिल्ह्य़ात ४४७ शाळांमध्ये ५ हजार ५५७ जागा रिक्त

नाशिक : सर्वाना शिक्षण हक्क’ अर्थात आरटीई कायदा अंतर्गत  प्रवेश प्रक्रिया यंदा करोनामुळे काहीशी रेंगाळली असली तरी आता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून  जिल्ह्य़ात याअंतर्गत सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेत १४१ विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश निश्चित केला आहे.

खासगी विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंसहाय्यित शाळांमध्ये प्रवेशस्तरावर २५ टक्के जागा वंचित आणि दुर्बल घटकांमधील मुलांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्यानुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षांत आरटीई अंतर्गत जिल्ह्य़ात ४४७ शाळांमध्ये पाच हजार ५५७ जागा रिक्त आहेत. जिल्ह्य़ात ऑनलाइन पध्दतीने १७ हजार ६३० पालकांचे अर्ज आले. टाळेबंदी लागू होण्यापूर्वी १७ मार्च रोजी पुणे येथे ऑनलाइन पध्दतीने पहिली सोडत काढण्यात आली होती. यामध्ये राज्य स्तरावर एक लाख ९२० विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यात नाशिक जिल्ह्य़ातील पाच हजार ३०७ विद्यार्थ्यांची निवड झाली. याबाबत पालकांना भ्रमणध्वनीद्वारे माहितीही देण्यात आली. परंतु, करोनामुळे पुढील प्रवेश प्रक्रियेचे कामकाज झाले नाही.

दुसरीकडे जूनमध्ये नव्या शैक्षणिक वर्षांस सुरूवात झाली असली तरी आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया रखडल्याने पालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. या सर्व पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गर्दीवर नियंत्रण रहावे यासाठी काही नियम शाळा आणि पालकांसाठी बंधनकारक करण्यात आले आहेत. यामध्ये सर्व जबाबदारी शाळेवर टाकण्यात आली आहे. शाळांकडून पालकांकडून सादर झालेल्या कागदपत्रांची तपासणी करत पात्र विद्यार्थ्यांना हंगामी प्रवेश दिला जात आहे.  नाशिक जिल्हा परिसरात आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमांच्या शाळांमध्ये १४१ विद्यार्थ्यांना हंगामी प्रवेश देण्यात आला आहे. पुढील टप्प्यात कागदपत्र तपासणी करणाऱ्या समितीसमोर शाळेच्या वतीने ही कागदपत्रे तपासली जातील. समिती कागदपत्रांची पुन्हा एकदा तपासणी करत विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करेल अशी माहिती जिल्हा शिक्षण अधिकारी डॉ. वैशाली वीर-झणकर यांनी दिली.