आतापर्यंत आठ बालकांना हक्काचा निवारा

नाशिक : टाळेबंदीच्या सहाव्या टप्प्यात काही र्निबध शिथिल झाल्यानंतर दत्तकविधान प्रक्रिया संथपणे सुरू झाली आहे. निर्बंध शिथिल होताच जिल्ह्य़ातून आतापर्यंत आठ बालकांची दत्तकविधान प्रक्रिया पूर्ण झाल्याने त्यांना हक्काचा निवारा मिळाला आहे.

मार्च महिन्यात करोनामुळे देशात टाळेबंदी लागू करण्यात आली. यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले. याचा अप्रत्यक्ष फटका अनाथ आश्रमातील बालकांना बसला. नाशिक जिल्ह्य़ात ‘कारा’च्या माध्यमातून होणारी दत्तक प्रक्रिया रखडली. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, बैठका घेऊन मार्च महिन्यात आधार आश्रमातील काही बालकांचे दत्तक विधान होणार होते. परंतु, टाळेबंदीमुळे प्रवासावर निर्बंध आल्याने बालकआणि पालकांची भेट होऊ शकली नाही. नात्याची वीण गुंफण्याआधीच सैल होते की काय, अशी शंका उपस्थित झाली.

चार महिन्यांपासून ही प्रक्रिया खोळंबली होती. टाळेबंदीच्या सहाव्या टप्प्यात सरकारने काही निर्बंध शिथील करताच दत्तक विधान प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने  होण्यास सुरुवात झाली. दत्तकविधान समितीसोबत ऑनलाइन पध्दतीने पालक, संस्थेचे अधिकारी यांची भेट होऊन ऑनलाइन आलेल्या कागदपत्रांची छाननी करण्यात येऊन बाळाला दत्तक म्हणून देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात येत आहे.

दीड महिन्यात आधार आश्रमातील सहा मुलगे आणि दोन मुली अशा आठ बालकांना हक्काचा निवारा मिळाला आहे. ही बालके महाराष्ट्रात, कर्नाटक , तेलंगणामध्ये आपल्या  स्वतच्या घरात पोहचली आहेत. लवकरच अन्य दोन मुलांना हक्काचा निवारा मिळणार असल्याची माहिती दत्तक प्रक्रिया समन्वयक राहुल जाधव यांनी दिली.