वादळात ६५० वीज खांब कोसळले, १०० उपकेंद्र बंद

नाशिक : ‘निसर्ग’ चक्री वादळाचा सर्वाधिक फटका महावितरणला बसला. जिल्ह्य़ात महावितरणचे तब्बल ६५० खांब जमीनदोस्त झाले. तर १०० हून अधिक उपकेंद्रे बंद पडली. एक हजारहून अधिक वाहिन्यांवरील वीज पुरवठा खंडित झाला. यामुळे बुधवारी सायंकाळपासून शहरातील अनेक भागात खंडित झालेला वीज पुरवठा जवळपास १७ तासानंतर पूर्ववत झाला. ग्रामीणच्या सिन्नर, पेठ, इगतपुरी भागात तो पूर्ववत होण्यास आणखी काही तास लागणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. करोना संकटात अभियंते, जनमित्र आदींनी शारीरिक अंतर राखत युध्दपातळीवर काम केले.

चक्रीवादळाचा शेतातील पिकांसोबत वीज यंत्रणेवर मोठा आघात झाला. मोठी झाडे, फांद्या कोसळल्याने अनेक वाहिन्यांचा वीज पुरवठा बंद पडला. काही वाहिन्यांचा वीज पुरवठा सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आला. त्याची झळ नाशिक शहराच्या पाणी पुरवठा व्यवस्थेला बसली. बुधवारी सायंकाळी आणि गुरूवारी सकाळी शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवावा लागला. शहर आणि ग्रामीणमधील अनेक भाग अंधारात बुडाले. वादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर महावितरणने वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम हाती घेतले. तेव्हां नुकसानीचे प्रमाणही समोर आले. जिल्ह्य़ात तब्बल ६५० वीज खांब कोसळले.  झाडे, खांब कोसळल्याने एक हजारपेक्षा अधिक वाहिन्यांवरील वीज पुरवठा खंडित झाला. वादळ, पाऊस यामुळे अनेक ठिकाणी रात्री काम करता आले नाही. सकाळी महावितरणची यंत्रणा सर्व शक्तीनिशी भिडली. वादळाने शेकडो वीज खांब जमीनदोस्त झाले. यात शहरात ७०, ग्रामीण भागात २०० तर चांदवड भागात २०० आणि उर्वरित इतर भागातील आहेत.

वादळी पावसाचा १०० उपकेंद्रांना फटका बसला. नाशिक शहरातील २६, ग्रामीण भागातील ३७, चांदवड विभागातील नऊ आणि मालेगाव विभागातील २६ उपकेंद्रे बंद पडली. दुरुस्ती कामे युध्दपातळीवर सुरू करण्यात आली. यामुळे गुरूवारी सकाळी १० वाजेपर्यंत शहरातील सर्वच भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश आल्याचे महावितरणने म्हटले आहे. करोना काळात सुरक्षित अंतर राखून ही कामे प्रगतीपथावर आहेत. शहराच्या तुलनेत भौगोलिक स्थितीमुळे ग्रामीण भागात दुरुस्ती कामास वेळ लागत आहे. सिन्नरच्या घाटात वीज वाहिन्यांचे काम दुपापर्यंत सुरू होते. पेठ, इगतपुरी भागात वीज पुरवठा पूर्ववत होण्यास काही वेळ लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.