News Flash

अनुकंपा तत्वावर १४७ उमेदवारांची महापालिकेत नेमणूक

शासकीय निर्णयानुसार अनुकंपा नियुक्तीसाठी १४७ पदे उपलब्ध होत आहेत.

प्रतिनिधिक छायाचित्र

नाशिक : महानगरपालिकेत अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीसाठी पात्रता, अपात्रता तपासून अनुकंपा कर्मचारी निवड समितीने अर्जाची छाननी करून १७५ पात्र उमेदवारांची प्राथमिक यादी निश्चित केली. शासकीय निर्णयानुसार अनुकंपा नियुक्तीसाठी १४७ पदे उपलब्ध होत आहेत. कर्मचारी निवड समितीने केलेल्या प्राथमिक यादीतील एक ते १४७ उमेदवारांना महापालिका आस्थापनेवरील रिक्त पदांवर त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार नेमणुका देण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे.

या संदर्भात विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी महापालिकेच्या सेवेत असताना मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्ती देण्याबाबत प्रशासनाला विचारणा केली होती. त्या अनुषंगाने मनपाच्या प्रशासन विभागाने उपरोक्त माहिती दिली असल्याचे बोरस्ते यांनी म्हटले आहे. करोनाकाळात मनपाच्या काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.

या संदर्भात पालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्यांची संख्या प्रशासनाला माहिती नसल्याचे उघड झाले होते. यावरून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर आयुक्तांनी करोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची विभागनिहाय माहिती मागवली. करोनाच्या आधीही सेवेत असताना अनेक कर्मचाऱ्यांच्या मृत्यू झाला आहे. त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीचा विषय रखडला आहे. या संदर्भात बोरस्ते यांनी लेखी स्वरूपात विचारणा केल्यावर उपायुक्त (प्रशासन) मनोज घोडे यांनी सद्यस्थिती मांडली आहे.

अनुकंपा तत्त्वावरील २०१३ पासूनची सर्व प्रकरणे प्रलंबित आहेत. वारसांची शैक्षणिक अर्हता, वय, अन्य तपशिलात बदल झाल्याची शक्यता असल्याने अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती देण्यापूर्वी संबंधितांची अद्ययावत माहिती संकलित करून त्यानुसार प्रतीक्षा यादी अद्ययावत करणे आवश्यक होते. त्यासाठी सर्व उमेदवारांना पत्र पाठवून माहिती संकलनाचे काम करण्यात आले. अनुंकपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी कर्मचारी निवड समितीने विविध निकषांनुसार छाननी केली. माहिती घेतली. नंतर बैठकीचे इतिवृत्त प्रसिध्द करून हरकती मागविण्यात आल्या. या सर्व प्रक्रिया पार पाडून समितीमार्फत छाननी होऊन १७५ पात्र उमेदवारांची प्राथमिक प्रतीक्षा यादी निश्चित केली आहे.

वेळोवेळच्या शासन निर्णयानुसार अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी मनपात १४७ पदे उपलब्ध होत आहेत. प्रतीक्षा यादीतील पहिल्या १४७ जणांची मनपा आस्थापनेतील रिक्त पदांवर नेमणुका करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे घोडे पाटील यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 1:12 am

Web Title: appointment of 147 candidates in nmc on compassionate basis zws 70
Next Stories
1 लघुपटाद्वारे शिक्षणातील दरीवर प्रकाशझोत
2 लासलगाव बाजार समितीचे ग्रहण दूर
3 शहर बससेवेचे भिजत घोंगडे
Just Now!
X