पालकमंत्री छगन भुजबळ यांची सुचना

नाशिक /येवला : करोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता अतिरिक्त खाटांचे नियोजन करण्यात यावे, अशी सुचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येवला येथील संपर्क कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना केली.

करोनाच्या पार्श्वभूमीवर येवला, निफाड आणि नांदगाव तालुक्यात प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना आणि नियोजन याविषयी भुजबळ यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी भुजबळ यांनी येवला, नांदगाव आणि निफाड तालुक्यातील करोनाविषयी करण्यात येत असलेल्या उपाययोजना आणि नियोजनाचा आढावा घेतला. येवला शहरातील १०० टक्के कुटुंबांचे आरोग्याचे सर्वेक्षण आणि तपासणी पूर्ण झाली आहे. शहरात १९१६ इतर आजारांनी ग्रस्त रुग्ण सापडले असून त्यांच्यावर विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यांना रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी औषधे देऊन त्यांच्यावर नियमित लक्ष द्यावे, तसेच येवला शहराच्या धर्तीवर जिल्ह्यातील इतर तालुक्यांची शहरे आणि ग्रामीण भागातही तपासणी करावी, जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ५८ टक्के असून येवल्यात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ७० टक्के आहे. असे असले तरी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वेक्षण सुरूच ठेवावे, अशा सुचना भुजबळ यांनी केल्या आहेत.

करोनाला अटकाव करण्यासाठी खासगी डॉक्टरांशी संवाद

साधून या प्रक्रियेत त्यांचीही मदत घेण्यास त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना सांगितले. येवला उपजिल्हा रुग्णालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. तसेच शहरातील गर्दी टाळण्यासाठी दुकानांना वेळ वाढवून द्यावी आणि त्यावर पोलिसांनी नियंत्रण ठेवावे, दुकाने बंद करण्यासाठी कुणावरही दबाव आणू नये, दिलेल्या वेळेत दुकाने नियमित सुरू राहतील आणि नागरिकांना आवश्यक वस्तु मिळतील याची दक्षता घेण्यास त्यांनी सांगितले.

शेतकरी पीक कर्जाचाही भुजबळ यांनी आढावा घेतला. शासनाने दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत कमी कर्ज वाटप होत असल्याने अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. उद्दिष्टाप्रमाणे शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्याच्या सुचना केल्या. तसेच मका खरेदी प्रक्रियेस मुदतवाढ मिळाली असून उर्वरित शेतकऱ्यांचा मका लवकरात लवकर खरेदी करून शेतकऱ्यांचा संपूर्ण मका खरेदी करण्याचे आदेश त्यांनी दिले. वीज प्रश्नांचाही त्यांनी आढावा घेतला.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, प्रांताधिकारी सोपान कासार, निफाडच्या प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, येवल्याचे तहसीलदार रोहिदास वारुळे, निफाडचे तहसीलदार दीपक पाटील, मनमाड पोलीस उपअधीक्षक समरसिंग साळवे, निफाडचे उपअधीक्षक माधव रेड्डी, गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख, निफाडचे गटविकास अधिकारी डॉ. संदिप कराड,  येवल्याच्या मुख्याधिकारी संगीता नांदुरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शैलजा कृपास्वामी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एच. आर. गायकवाड, लासलगाव येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. सूर्यवंशी, शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी, तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी, लासलगाव पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे, सहायक निबंधक एकनाथ पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.