नाशिक : रिक्षाचालकांची गुंडागर्दी नाशिककरांसाठी नवी नाही. त्याचाच अनुभव रविवारी रात्री पुन्हा आला. रात्री उशिरा एका चारचाकी वाहनचालकाशी रिक्षाचालकाने हुज्जत घालत त्याला मारहाण केली. त्याच्या पत्नीला शिवीगाळही केली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

रविवारी रात्री कॉलेज रोड परिसरातून बांधकाम व्यावसायिक सचिन गणोरे हे कुटुंबासमवेत काही कामानिमित्त कारमधून जात होते. बी.वाय.के. महाविद्यालयासमोर त्यांची कार आली असता समोरून येणाऱ्या रिक्षाने त्यांच्या वाहनास कट मारला. याबाबत गणोरे यांनी रिक्षाचालक प्रल्हाद बनसोडे (रा. संत कबीरनगर झोपडपट्टी) याला विचारणा केली असता त्याने गणोरे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद सुरू असताना अन्य तीन ते चार रिक्षावाले एकत्र आले. त्यांनी गणोरे यांच्यावर दगड फेकला. गणोरे यांच्या पत्नीने या प्रकाराला विरोध करण्याचा प्रयत्न केला असता रिक्षाचालकांनी त्यांनाही शिवीगाळ केली. गणोरे यांनी या संदर्भात गंगापूर पोलीस ठाण्यात संशयित बनसोडेविरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी रात्री उशिरा त्याला ताब्यात घेतले. पोलीस बनसोडेची चौकशी करत असून अन्य संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती गंगापूर पोलिसांनी दिली.

दरम्यान, नाशिकमध्ये  गुंड आणि बेशिस्त रिक्षाचालकांकडून वाहतूक पोलिसांनाही मारहाण होत असल्याने तेही त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यास कचरतात.अपप्रवृत्ती, नियम धाब्यावर बसविणाऱ्या चालकांविरोधात वाहतूक पोलीस अधूनमधून कारवाई करतात. तथापि, अशी कारवाई सुरू झाली की, लगेचच रिक्षाचालकांच्या राजकीय संघटना त्यांची बाजू घेऊन विरोध करतात. परिणामी पोलिसी कारवाई सौम्य होते. हा नाशिककरांसाठी कायमचा अनुभव आहे. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर आता तरी पोलिसांनी बेशिस्त रिक्षाचालकांना आपला खाक्या दाखविण्याची गरज प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.