इंडियन बँक्स असोसिएशनतर्फे पुकारण्यात आलेल्या संपाच्या दुसऱ्या दिवशीही म्हणजे गुरुवारी राष्ट्रीयीकृत बँकांच्या जिल्ह्य़ातील ४२५ शाखांमध्ये शुकशुकाट पसरल्याचे पाहावयास मिळाले. सुमारे साडेतीन हजार कर्मचारी संपात सहभागी झाल्याने दैनंदिन व्यवहार ठप्प झाले. सलग दोन दिवस थंडावलेले आर्थिक व्यवहार शुक्रवारपासून सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.

वेतन करारास होणारा विलंब आणि बँक व्यवस्थापनाने देऊ केलेल्या अवघ्या दोन टक्के वेतनवाढीच्या निषेधार्थ युनायटेड फोरम बँक युनियन्सने पुकारलेल्या दोन दिवसीय संपाचा फटका दुसऱ्या दिवशीही व्यापारी, उद्योजकांसह सर्वसामान्यांना बसला. राष्ट्रीयीकृत बँकांचे व्यवहार बंद राहिले. संपामुळे अनेकांना सहकारी, खासगी बँकांच्या सेवांचा आधार घ्यावा लागला. राष्ट्रीयीकृत बँकेतील संपामुळे खासगी बँकांच्या एटीएमवर सर्वाची भिस्त राहिली. रोकडची गरज लक्षात घेऊन काही बँकांनी त्या अनुषंगाने व्यवस्था केली. तथापि, पैसे काढणाऱ्यांचे प्रमाण आणि उपलब्ध रोकड यांचे गुणोत्तर व्यस्त होते. ज्या ठिकाणी रोकड होती, तिथे पैसे काढणाऱ्यांची गर्दी झाली. दुसरीकडे अनेक एटीएम केंद्रे रोकडअभावी बंद असल्याचे फलक लागले. निवृत्तिवेतनधारकांना संपाचा फटका बसणार असल्याचे सांगितले जाते. एक तारखेला बँक खात्यात जमा होणारे निवृत्तिवेतन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. कोटय़वधींची धनादेश वटणावळ संपामुळे झालेली नाही. संपाच्या दुसऱ्या दिवशी बँक संघटनांच्या वतीने सीबीएसलगतच्या एसबीआय शाखेसमोर निदर्शने करण्यात आली. सरकारने केलेली दोन टक्के वेतनवाढ अत्यल्प आहे. बँक कर्मचाऱ्यांची भरती करावी, पगारात पुरेशी वाढ देऊन सेवा शर्तीत सुधारणा आदी मागण्यांकडे आंदोलकांनी लक्ष वेधले. या वेळी शिवा भामरे, शिवाजी पाटील, किशोर मोडक, प्रवीण घुले, श्रीपाद हरदास, प्रशांत गायधनी आदी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.