बायोमेट्रिक, सेल्फी हजेरीला विरोध

प्रलंबित मागण्यांकडे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासन सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याचा आक्षेप घेत आठ दिवसांत मागण्यांची सोडवणूक न झाल्यास ८ जानेवारी रोजी लाक्षणिक संप करण्याचा इशारा महानगरपालिका कामगार-कर्मचारी संघटना कृती समितीने दिला आहे. सेल्फी, बायोमेटिक हजेरीच्या पद्धतीला समितीने विरोध दर्शविला आहे. ही पद्धत तत्काळ बंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

बाह्य़ मार्गाने सफाई कामगार नियुक्तीची निविदा रद्द करून ही पदे कंत्राटी पद्धतीने न भरता मानधनावर अथवा रोजंदारीने नियुक्त करून भरावीत. ठेकेदारी पद्धत बंद करावी, अधिकारी-कर्मचाऱ्यांना २००९ मधील सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनुसार सुधारित संरचना वेतनश्रेणी लागू करण्यात आली. विद्यमान श्रेणीवर आधारित सातव्या वेतन आयोगाचे वेतनस्तर लागू करावे, अशी समितीची मागणी आहे.

महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टावरील सर्व संवर्गातील अधिकारी, कर्मचारी यांना १०० टक्के पदोन्नती मिळावी, अशीही मागणी आहे. कित्येक वर्षांत पदोन्नती समितीची एकही बैठक झाली नाही. वरिष्ठ पदाचा पगार दिला जातो, मात्र पद दिले गेले नाही. कालबद्ध पदोन्नती देण्याची कार्यवाही करावी, वैद्यकीय विमा पूर्ववत करून हप्त्याची निम्मी रक्कम पालिकेने भरावी, निवृत्त कर्मचाऱ्यांना मालकी हक्काने घरे, महापालिका क्षेत्राबाहेर जाणाऱ्या अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या दिल्या जाणाऱ्या भत्त्यात वाढ, अनेक विभागातील कर्मचाऱ्यांना दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारची सुट्टी अशा अनेक प्रश्नांकडे कृती समितीने लक्ष वेधले आहे. यावर सकारात्मक निर्णय न झाल्यास नवीन वर्षांत ८ तारखेला लाक्षणिक संप करण्याचा इशारा देण्यात आला आहे. लाक्षणिक संपाची नोटीस समितीने निवेदनासह पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना दिली.

संपात अग्निशमन, पाणीपुरवठा, दवाखाने या अत्यावश्यक सेवा वगळता सर्व विभागांतील अधिकारी-कर्मचारी सहभागी होतील. सर्व कामगार संघटनांची बैठक होऊन लाक्षणिक संपाचा निर्णय घेण्यात आल्याचे कामगार सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे यांनी सांगितले. यावेळी कायदे सल्लागार तथा नगरसेवक गुरुमित बग्गा, समता परिषदेचे अध्यक्ष तथा नगरसेवक गजानन शेलार, सीटूचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, सफाई कर्मचारी विकास युनियनचे सुरेश मारू आदी उपस्थित होते.

बायोमेट्रिकला विरोध का?

कामगार-कर्मचारी संघटना कृती समितीने १५ मागण्यांकडे लक्ष वेधले. त्यात प्राधान्यक्रमावर असणारी मागणी म्हणजे सेल्फी, बायोमेट्रिक हजेरीची पद्धत बंद करण्याची आहे. सर्व रिक्त पदे भरल्यानंतर सेल्फी, बायोमेट्रिक हजेरी लागू करण्याचा विचार करावा. तोपर्यंत तातडीने ही पद्धती बंद करावी, असे समितीचे म्हणणे आहे. अधिकारी, कर्मचारी जर नियमित वेळेवर कामावर येत असतील तर त्यांना ही हजेरी पद्धती का नकोशी वाटते, हा प्रश्न आहे. महापालिकेत कोण कधी येते, कधी जाते हे कोणालाच माहिती नसते. महापालिकेत तुकाराम मुंढे आयुक्त असताना त्यांनी उशिरा येणाऱ्यांना दणका दिला होता. स्वत: वेळेत कामावर हजर होऊन त्यांनी सर्वाना शिस्त लावली होती. सेल्फी, बायोमेट्रिक हजेरीची पद्धत मनाप्रमाणे ये-जा करणाऱ्यांना रुचत नसल्याचे बंद करण्याच्या मागणीवरून अधोरेखित झाले आहे.