पंचायत समिती निवडणूक

शौचालय नसल्याच्या कारणास्तव भाजपच्या चिखलओहोळ गणातील उमेदवार सुनीता सूर्यवंशी यांचा अर्ज रद्द ठरविण्यात आला असून ग्रामपंचायत कर थकबाकीच्या कारणास्तव कळवाडी गटातील भाजपच्या उमेदवार बलबिरकौर गिल यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यासंदर्भातील हरकत मात्र फेटाळण्यात आली.

तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती उमेदवारी अर्ज-छाननी प्रक्रियेदरम्यान सेना उमेदवारांच्या वतीने सूर्यवंशी आणि गिल या दोन्ही उमेदवारांविरोधात हरकतीचे मुद्दे उपस्थित करून त्यांचे अर्ज रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर दोन्ही प्रकरणांमध्ये स्वतंत्ररीत्या सुनावणी होऊन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अजय मोरे यांनी निकाल दिला.

जिल्हा परिषदेच्या तालुक्यातील सात गटांसाठी ५६, तर पंचायत समितीच्या १४ गणांसाठी एकूण १०५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या सर्व अर्जाची छाननी करण्यात आली. कळवाडी गटाची छाननी सुरू झाल्यावर सेना उमेदवार अंजली कांदे यांचे सूचक विजय इप्पर यांनी भाजप उमेदवार बलबिरकौर गिल यांच्या मालकीच्या हॉटेलकडे ग्रामपंचायतीची थकबाकी असल्यासंदर्भात हरकत घेतली.

त्यानंतर चिखलओहळ गणातील सेना उमेदवार सरलाबाई शेळके यांचे सूचक गोरख अहिरराव यांनी भाजप उमेदवार सुनीता सूर्यवंशी यांच्याकडे शौचालय नसल्याची तक्रार करत त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याची मागणी केली.

या हरकतीच्या मुद्दय़ानंतर भाजप व सेना समर्थकांमध्ये शाब्दिक खडाजंगी सुरू झाल्याने सभागृहात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करून शांतता प्रस्थापित करावी लागली. कळवाडी गटाच्या भाजप उमेदवार गिल यांच्याकडे थकबाकी दिसून येत नसल्याचा निष्कर्ष काढत त्यांचा उमेदवारी अर्ज मंजूर करण्याचा निकाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिला. चिखलओहोळ गणाच्या भाजप उमेदवार सूर्यवंशी यांच्याकडे शौचालय नसल्याची हरकत मात्र त्यांनी मान्य केली असून त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याचा निकाल दिला आहे. भाजपच्या वतीने उमेदवारांचे एबी अर्ज देतांना पसंतीक्रम नमूद करण्यात आले होते. त्यानुसार चिखलओहोळ गणात प्रथम क्रमांकावरील उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यावर दुसऱ्या क्रमांकावरील बेबीबाई पिंजन या आता पक्षाच्या अधिकृत उमेदवार असतील असे भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पवार यांनी जाहीर केले आहे.