अजित पवार यांचा इशारा

वणी : महाराष्ट्र तहानलेला असताना येथे पाणी देण्याच्या योजना पूर्ण करण्याऐवजी त्या रद्द करून गुजरातच्या घशात पाणी घालण्याचे पाप भाजप सरकार करत आहे. त्यांचा हा डाव उधळून लावला जाईल, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीही या मुद्दय़ावरून भाजपवर टिकास्त्र सोडले.

दिंडोरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित निर्धार परिवर्तन संघर्ष यात्रेनिमित गुरुवारी सभा झाली. यावेळी हा इशारा देण्यात आला.

देशासह राज्यातील भाजप-सेना युतीने जिल्ह्यातील एकाही खासदार, आमदाराला मंत्रिपदाची संधी दिली नाही. त्यामुळे येथील सर्व प्रश्न प्रलंबित असून विकास पूर्ण थांबला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहे. कर्जमाफी फसवी निघाली, कांद्याला २०० रुपये अनुदान देऊन थट्टा केली. कोणत्याही शेतमालास भाव नाही. साखरेचे भाव कोसळल्याने कारखान्यांकडे उसाची एफआरपी द्यायला पैसे नाही. सरकार बँकांना पैसे देऊ देत नाही. भाजपने निश्चलनीकरणाद्वारे व्यापार शेती उद्ध्वस्त केली. सहकारी बँका, सोसायटय़ा मोडीत काढल्या असून आता या सरकारलाच मोडीत काढण्याची वेळ आल्याचे पवार यांनी सांगितले.  भुजबळ यांनी गुजरातला पाणी देण्याच्या मुद्दय़ावरून भाजपवर टिकास्त्र सोडले. घाटमाथ्यावरून समुद्रात वाहून जाणारे पाणी पूर्व भागात वळविण्यासाठी नार-पार प्रकल्प राबवत मांजरपाडासह १२ वळण योजनांचे काम सुरू केले. हे प्रकल्प पूर्ण झाले तर नाशिक नगरसह मराठवाडय़ाचा पाणीप्रश्न सुटणार आहे. मात्र युती सरकारने योजनांना खीळ घातली असून पाच वळण योजना रद्द केल्या. हा सर्व खटाटोप गुजरातला पाणी देण्यासाठी सरकार करत असून गुजरातसाठी पाणी देण्याचा करार करण्याच्या तयारीत आहे. मात्र काहीही झाले तरी महाराष्ट्राच्या हक्काचे नार-पारचे पाणी गुजरातला जाऊ देणार नसल्याचे भुजबळ यांनी सूचित केले. जीतेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकार संविधानाच्या गाभ्याला हात लावण्याचे काम करत असल्याचा आरोप केला. यावेळी आ. नरहरी झिरवाळ, श्रीराम शेटे, भारती पवार यांची भाषणे झाली.