वीज दरवाढीच्या प्रस्तावाविरोधात शनिवारी उद्योजक आणि व्यापारी संघटनांनी सायंकाळी चार तास ‘ब्लॅक आऊट’ पाळण्याच्या केलेल्या आवाहनास मुख्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. औद्योगिक वसाहतीत शनिवार हा सुटीचा दिवस असल्याने वीज वापरण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. दुसरीकडे पावसामुळे सायंकाळी एक ते दीड तास मुख्य बाजारपेठेतील वीज पुरवठा खंडित झाला. या एकंदर स्थितीत वीज दरवाढीच्या निषेधार्थ आयोजित आंदोलनास प्रतिसाद मिळाल्याचा दावा व्यापारी संघटनांनी केला आहे. महावितरण कंपनीने चार वर्षांच्या एकत्रित दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. या दरवाढीमुळे घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक देयकांत मोठी वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे. महावितरणच्या या प्रस्तावावर सोमवारी येथील नियोजन भवन येथे सुनावणी होणार आहे. या पाश्र्वभूमीवर, महावितरणच्या प्रस्तावित दरवाढीला विरोध करण्यासाठी शनिवारी सायंकाळी सहा ते रात्री दहा या कालावधीत वीज पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने विविध व्यापारी संघटनांच्या बैठकीत जाहीर केला. या आंदोलनामुळे शहरातील बाजारपेठेत अंधकार होईल, असा दावा केला गेला. दुपारपासून संततधार सुरू असल्याने दुपारी साडे चार वाजता रविवार कारंजा, अशोक स्तंभ, महात्मा गांधी रस्ता, मेनरोड या मुख्य बाजारपेठेसह अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला. दीड ते दोन तास वीज गायब राहिल्याने या काळात सर्वत्र अंधार पसरला. सायंकाळी सात वाजता वीज पुरवठा पूर्ववत झाला. तेव्हा मात्र, ‘ब्लॅक आऊट’ आंदोलनास फारसा प्रतिसाद लाभला नसल्याचे पहावयास मिळाले. काही अपवाद वगळता बहुतांश व्यापाऱ्यांनी प्रकाशझोतात आपले दैनंदिन व्यवहार सुरू ठेवले. हॉटेल्स व भव्य दालनांच्या फलकांवरील रंगीत दिवेही नेहमीप्रमाणे चमकत होते. औद्योगिक वसाहतीत हा दिवस पाळण्याचा प्रश्नच नव्हता. कारण, शनिवार हा औद्योगिक वसाहतीचा सुटीचा दिवस आहे. या दिवशी बहुतांश कारखाने बंद असतात.