अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने वाहनांचा वेग स्वयंचलित पद्धतीने टिपणार

प्रवाशांची पिळवणूक करणाऱ्या रिक्षा चालकांचे ‘स्टिंग’ करण्याची मोहीम हाती घेणाऱ्या शहर वाहतूक पोलीस दलाच्या ताफ्यात आता आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दोन ‘इंटरसेप्टर’ मोटारी दाखल झाल्या आहेत. या मोटारीचे वैशिष्टय़ म्हणजे रस्त्याने जाणाऱ्या वाहनांचा वेग स्वयंचलित पद्धतीने टिपला जाणार आहे. तसेच मद्यपी वाहनचालक,  मोटारीच्या काचेला बसविल्या जाणाऱ्या गडद फिल्म यांची तपासणी आधुनिक तंत्राने होणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माळी यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

या व्यवस्थेचे वैशिष्टय़ म्हणजे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांना स्वयंचलित पद्धतीने थेट दंडाची पावती भ्रमणध्वनी आणि मेलवर पाठविली जाणार आहे. ही वाहने रस्त्यावर कार्यान्वित झाली असून वाहनधारकांनी नियमांचे पालन करावे, अशी वाहतूक पोलीस यंत्रणेची अपेक्षा असल्याचेही माळी म्हणाले.

शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस विविध स्वरूपांचे उपक्रम राबवीत आहेत. त्या अंतर्गत बेशिस्त रिक्षाचालकांना वठणीवर आणण्याचा अंतर्भाव आहे. एक डिसेंबरपासून शहरात मीटरद्वारे भाडे आकारणी बंधनकारक आहे. रिक्षाचालक अवाच्या सवा भाडे आकारून प्रवाशांची पिळवणूक करतात. संबंधितांवर नजर ठेवण्यासाठी नुकतेच वाहतूक पोलिसांकडे १० अत्याधुनिक कॅमेरे आले आहेत. कॅमेऱ्याच्या मदतीने वाहतूक पोलीस प्रवासी बनून रिक्षा चालकांच्या कार्यशैलीवर नजर ठेवणार आहेत.

परवाना नसलेल्या पाच हजार रिक्षा रस्त्यावर धावत असल्याचा अंदाज आहे. त्या जप्त करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या घटनाक्रमात शुक्रवारी नवीन अध्याय जोडला गेला. शहरातील रस्त्यांवर वाहनांसाठी वेगमर्यादा निश्चित आहे. काही रस्त्यांवर ताशी २०, तर काही रस्त्यांवर ही मर्यादा ताशी ५० किलोमीटपर्यंत आहे. परंतु, युवावर्गाकडून अधिक्याने त्याचे पालन होत नाही. वाहन भरधाव दामटण्याचे प्रकार सर्वत्र सुरू असतात. संबंधितांच्या वाहनांचा वेग मापन करण्याची सुविधा नसल्याने पोलिसांना कारवाई करताना मर्यादा येत होत्या. ही कसर नव्याने दाखल झालेल्या इंटरसेप्टर वाहनाने भरून निघाली आहे.

या मोटारीत रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या कोणत्याही वाहनाचा वेग मोजण्याची व्यवस्था आहे. ‘स्पीडो मीटर’ वेग टिपते. संबंधित वाहन वेगमर्यादेचे उल्लंघन करीत असल्यास त्याला थांबविण्याची गरज नाही. त्याचा वाहन क्रमांक यंत्रणा आपोआप टिपते. संबंधित वाहनमालकास ऑनलाइन पद्धतीने दंडात्मक कारवाईची पावती भ्रमणध्वनी, ईमेलवर पाठविली जाणार आहे.

याशिवाय या मोटारीत मद्यपान करणाऱ्या चालकांची तपासणी करणारे ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’ आहे. ज्या चालकावर यंत्रणेला संशय आहे, त्याला थांबवून ही चाचणी मोटारीतील उपकरणाद्वारे घेतली जाते. लगेच निष्कर्ष मिळत असल्याने चालकावर कारवाई करणे सोपे जाईल. याव्यतिरिक्त इंटरसेप्टर मोटारीत ‘टिन्ट मीटर’ आहे.

त्याद्वारे चारचाकी मोटारींच्या काचांना वापरली जाणारी ‘फिल्म’ नियमानुसार आहे की नाही याचे परीक्षण करता येईल. ती किती टक्के गडद आहे, नियमानुसार आहे की नाही याची स्पष्टता झाल्याने संबंधित वाहनधारकावर लगेचच कारवाई करता येईल. ही वाहने शुक्रवारी रस्त्यावर उतरली. वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी त्याचे प्रशिक्षण घेत आहे. या मोटारींसाठी प्रत्येकी दोन कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.

दोन अत्याधुनिक वाहने पोलिसांच्या ताफ्यात

रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची वेगमर्यादा मापन करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे पुरेशी साधने नव्हती. भरधाव जाणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई होत असे, पण त्यास मर्यादा होत्या. संबंधित वाहनधारकांना रोखण्यासाठी तेवढय़ाच वेगात मार्गक्रमण करण्याचा प्रश्न होता. आधुनिक उपकरणाने हा विषय मार्गी लागला आहे. या व्यवस्थेत संबंधित वाहनधारकाला थांबविण्याची गरज नाही. यंत्रणा स्वयंचलित पद्धतीने वाहनांचा वेग मोजते. वेगमर्यादेचे उल्लंघन झाल्यास वाहनाच्या क्रमांकावरून वाहनधारकास दंडात्मक नोटीस पाठविली जाते.