News Flash

पांडवलेणीच्या पायथ्याशी उद्यान फुलले!

उद्यानात प्रवेश केल्यानंतर ठिकठिकाणी फुलपाखरांच्या आकाराची आसन व्यवस्था निसर्गप्रेमींना खुणावते.

जवाहरलाल नेहरू वन उद्यानातील ‘लेझर शो’

आकर्षक वन उद्यानात ‘परदेशी’ भ्रमंतीचा पर्यटकांना अनुभव; महापालिका व टाटा ट्रस्टचा उपक्रम

डोलणाऱ्या हत्तींची महाकाय प्रतिकृती.. खुल्या मैदानात सुरू असलेला विलक्षण ‘लेझर शो’.. रंगीबेरंगी फुलपाखरांच्या आकारातील बैठकव्यवस्था.. ‘हसा खेळा शिस्त पाळा’ असा संदेश देणारे फलक.. बच्चे कंपनीसाठी तयार करण्यात आलेला बगिचा.. परिसरात भटकंती करण्यासाठी सायकलची खास व्यवस्था.. ही वैशिष्टय़े आहेत पांडवलेणीच्या पायथ्याशी महापालिका आणि टाटा ट्रस्टच्या सहकार्याने साकारलेल्या जवाहरलाल नेहरू वन उद्यानाची. या उद्यानात फेरफटका मारल्यास जणू परदेशात भ्रमंती करत असल्याचा अनुभव व्हावा अशी त्याची विलक्षण रचना पर्यटकांना सध्या मोहवीत आहे. हे आकर्षक उद्यान पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे.

वन विकास महामंडळ, नाशिक महापालिका आणि टाटा ट्रस्ट यांच्या सहकार्याने निर्मिलेल्या या उद्यानाची संकल्पना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली होती. त्यातून वनौषधी उद्यानाचे नूतनीकरण करण्यात आले. या उद्यानाचे वेगळेपण प्रथमदर्शनी लक्षात यावे यासाठी खास भव्य फुलपाखराच्या आकाराचे आकर्षक विद्युत रोषणाईची व्यवस्था असलेले प्रवेशद्वार तयार करण्यात आले आहे. त्याचा दरवाजाच ४० फुटांचा आहे. प्रवेशद्वाराची ही रचना खुद्द राज यांनी चित्र काढून मांडली होती. त्यांच्या चित्राचे हे वास्तव रूप असल्याचे उद्यानाचे रचनाकार संजय दाबके यांनी सांगितले. उद्यानात प्रवेश केल्यानंतर ठिकठिकाणी फुलपाखरांच्या आकाराची आसन व्यवस्था निसर्गप्रेमींना खुणावते.

बच्चे कंपनीसाठी या ठिकाणी खास हत्तींचे अभयारण्यही साकारले गेले आहे. डोलणाऱ्या सात कृत्रिम हत्तींचा त्यात अंतर्भाव आहे. या ठिकाणी बच्चे कंपनीला हत्तीची माहिती मिळणार आहे. उद्यानात अनेक दुर्मीळ औषधी वनस्पती असून त्याचे योग्य पद्धतीने जतन करण्यात आले आहे. कक्षाकडे तसेच अन्य ठिकाणी जाण्यासाठी नेहमीच्या पायवाटेपेक्षा वेगळ्या प्रकारच्या फरशीचा वापर करण्यात आला, जेणेकरून पावसाळ्यातही पर्यटकांना मुक्त भटकंती करता येईल. हा संपूर्ण परिसर अतिशय विस्तीर्ण आहे. पायी संपूर्ण भटकंती करणे अवघड आहे. हे लक्षात घेऊन हेल्मेटसह सायकलची खास व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे.

वनौषधी उद्यानात वन विभागाच्या सहकार्याने वनसंपदेची माहिती देणारे खास दालन असून वनांची सद्य:स्थिती, वनात कोणत्या वनस्पती आढळतात, त्या ठिकाणी असणारी जैवसंपदा याची माहिती फलक तसेच प्रतिकृतीतून देण्यात आली आहे. याशिवाय परिसरात झाडांमुळे तयार होणारा पालापाचोळा पाहता त्याच ठिकाणी सेंद्रिय पद्धतीने खतनिर्मितीचा प्रयोगही होत आहे. भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन या ठिकाणी रोपवे सुरू करण्याचा मानस आहे. याशिवाय जॉगिंग ट्रॅक, मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी, उद्यान, बोलणारी झाडे, हत्तीचे शिल्प अशी खास बच्चे कंपनीसाठी व्यवस्था करण्यात आल्याने पर्यटनासाठी तसेच निसर्गाच्या सान्निध्यात विरंगुळ्याचे चार क्षण घालविण्यासाठी हे उद्यान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. टाटा ट्रस्ट व महापालिका यांनी उपक्रमांची जबाबदारी घेतली आहे.

उद्यानाची वैशिष्टय़े

*   भव्य फुलपाखराचे विद्युत  रोषणाई केलेले प्रवेशद्वार

*  ठिकठिकाणी फुलपाखरांच्या आकाराची आसनव्यवस्था

* अ‍ॅम्पी थिएटरमधील  ‘लेझर शो’

*  बच्चे कंपनीसाठी  डोलणारे हत्तीचे अभयारण्य

*  दुर्मीळ औषधी वनस्पती

* पर्यटनासाठी सायकल व्यवस्था

* वनसंपदेच्या माहितीचे दालन

*  सेंद्रिय खतनिर्मितीचे प्रयोग

*  जॉगिंग ट्रॅक, खेळणी उद्यान

‘कथा अरण्याची’ लेझर शो

उद्यानाचे दुसरे वैशिष्टय़ म्हणजे खुल्या अ‍ॅम्पी थिएटरमध्ये दाखविण्यात येणारा ‘लेझर शो’. या कक्षाला ‘कथा अरण्याची’ असे नाव देण्यात आले आहे. देशात व आशिया खंडातही आधुनिक तंत्राचा वापर करून निर्मिलेला हा एकमेव लेझर शो आहे. त्याची कार्यप्रणाली स्वयंचलित आहे. गर्दीच्या वेळी तो स्वयंचलित होतो. त्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज नाही.

या कक्षात आजच्या पिढीला पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी तीन कृत्रिम झाडे तयार करत ‘कथा अरण्याची’ हा प्रवास मांडला जात आहे. अरण्य.. काजव्यांचा लपाछपीचा सुरू असणारा खेळ.. पानांची सळसळ.. हे संगीतातून मांडत असताना अरण्यातील एक कुटुंब आपली व्यथा मांडते. मनुष्याला पर्यावरण रक्षणाची साद घालताना वृक्षांची कत्तल अशीच सुरू राहिली तर सर्वनाश अटळ असल्याचा संदेश या ‘लेझर शो’मधून देण्यात येतो.

नाना, भरतही वन उद्यानाच्या प्रेमात

नाशिक : नावे ठेवायची असतील तर कशालाही ठेवता येतात; परंतु जे काम चांगले आहे, त्याला चांगलेच म्हणायला हवे, असे सांगत नाशिक येथे उभारलेले वनौषधी उद्यान राज्यात कुठेही नसल्याचे प्रशस्तिपत्रक देत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज ठाकरे यांच्या संकल्पनांचे कौतुक केले.

महापालिकेतील सत्ताधारी मनसेने उभारलेल्या जीनिव्हा फाऊंटन, वाहतूक बेट आणि टाटा ट्रस्टच्या मदतीने साकारलेले वनौषधी उद्यान यांचा लोकार्पण सोहळा पाटेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमास मनसे अध्यक्ष राज यांच्यासह अभिनेते भरत जाधव, केदार शिंदे, पुष्कर श्रोत्री, महापौर अशोक मुर्तडक आदी उपस्थित होते. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून राज्यात अनेक भागांत भ्रमंती झाली. मात्र, असे उपक्रम पाहावयास मिळाले नसल्याचे नानांनी सांगितले. सध्या विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल होत आहे. या स्थितीत पर्यावरण संवर्धनास हातभार लावणाऱ्या भव्यदिव्य उद्यानाची उभारणी झाली. आता हे उद्यान सांभाळण्याची जबाबदारी नाशिककरांची असल्याचे त्यांनी सूचित केले.

निवडणुकीत मत कोणाला द्यायचे, हा तुमचा प्रश्न आहे; परंतु चांगल्या कामाला दाद द्यायला हवी. नाशिककरही सर्वाना जोखून राज यांच्या कामाला पसंती देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहरातील हे प्रकल्प पाहून नानांसह इतर अभिनेतेही चकित झाले. या प्रकल्पासाठी वन विभागाच्या अखत्यारीतील जागा महापालिकेला देण्यात आली. पालिकेने टाटा ट्रस्टच्या मदतीने वनौषधी उद्यानाची उभारणी केली. असा देशातील हा एकमेव प्रकल्प असल्याचे राज यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देण्यास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सहकार्य केले.

रतन टाटा यांच्या सहकार्यामुळे या प्रकल्पाचे काम सुंदर झाले. सरकार ते सरकार काम करणे कठीण असते. महापालिका ते सरकार काम करणे त्यापेक्षा अवघड असते. या प्रकल्पाची पाहणी पुढील आठवडय़ात रतन टाटा करणार आहेत. शहरात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने स्मारक उभारले जाणार आहे. स्मारकाच्या आपल्या कल्पना वेगळ्या असल्याचे राज यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 1:58 am

Web Title: botanical garden in nashik city opened
Next Stories
1 त्र्यंबकमधील ‘प्राप्तीकर’च्या कारवाईचा तपशील गुलदस्त्यात
2 छबु नागरेची एकाच बँकेत नऊ खाती
3 नाशिकही ‘लेझर’च्या दुनियेत
Just Now!
X