18 July 2019

News Flash

प्रसिद्धीअभावी लाभार्थी हिरकणी कक्षाविषयी अनभिज्ञ

उद्यान, मंदिर परिसरासह अन्य सार्वजनिक ठिकाणी अद्याप हिरकणी कक्ष सुरू झालेला नाही.

प्रतिनिधिक छायाचित्र

नाशिक : स्तनदा मातांना सार्वजनिक ठिकाणी बाळाला स्तनपान करता यावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेला ‘हिरकणी कक्ष’ पुरेशा प्रसिद्धी अभावी दुर्लक्षित आहे. आरोग्य विभाग, राज्य परिवहन वगळता अन्य शासकीय, निमशासकीय कार्यालये, उद्यान, मंदिर परिसरासह अन्य सार्वजनिक ठिकाणी अद्याप हिरकणी कक्ष सुरू झालेला नाही. वेगवेगळ्या कामाची प्रसिद्धी करणारा महिला बालकल्याण विभाग हिरकणी कक्षाच्या प्रसिद्धीपासून दूर असल्याने त्याविषयी लाभार्थीच अनभिज्ञ असल्याचे चित्र जिल्हा परिसरात आहे.

कामानिमित्त घराबाहेर पडल्यावर सोबत बाळ असेल तर त्याला दूध पाजता यावे, यासाठी शांत वातावरण मातेला मिळावे, या उद्देशाने राज्य शासनाने सार्वजनिक ठिकाणी हिरकणी कक्ष सुरू करण्याचा सुचना केल्या आहेत. ही सूचना आरोग्य विभाग तसेच राज्य परिवहनच्या वतीने काही अंशी प्रत्यक्ष अमलात आणण्यात आली आहे. आरोग्य विभागाचा विचार केल्यास जिल्ह्य़ातील प्राथमिक, ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालयांसह जिल्हा रुग्णालयात हिरकणी कक्ष गेल्या दोन वर्षांपासून कार्यान्वित आहे. हजाराहून अधिक महिलांनी कक्षाचा लाभ घेतला आहे. स्तनपानाचे महत्त्व लक्षात घेता स्तनदा मातेला या कक्षात स्तनपान कसे करावे, बाळाला त्यांच्या वयोमानानुसार आहार कसा द्यावा, त्याच्यासाठी आवश्यक लसीकरण, जननी सुरक्षा योजना, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया आदी योजनांची माहिती फलकाद्वारे, तर कधी समुपदेशनाद्वारे देण्यात येते. तसेच लहान बाळास खेळण्यासाठी खेळणी आणि अन्य सामान ठेवण्यात येते. माता आणि बालकाला प्रसन्न वाटेल असा कक्ष सर्व रुग्णालयांमध्ये सज्ज ठेवण्यात आला आहे.

दुसरीकडे, जिल्ह्य़ातील राज्य परिवहनच्या १३ आगारांमध्ये हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आला असला तरी बहुतेक ठिकाणी तो कुलूपबंद अवस्थेत आहे. बस स्थानक परिसरातील एका कोपऱ्यात लाकडी फळ्यांचा आडोसा करत त्या जागेला हिरकणी कक्ष नाव देण्यात आले. या अंधाऱ्या जागेत जाण्यासाठी स्तनदा माता नाखूश असतात. तेथील कुबट वातावरणापेक्षा अनेकांकडून बाटलीतून दूध देण्याचा पर्याय स्वीकारण्यात येतो. उद्यान, मंदिर, रेल्वे स्थानकासह अन्य सार्वजनिक ठिकाणे, शासकीय कार्यालये, नाशिक महापालिका विभागीय कार्यालय आणि अन्य ठिकाणी अद्याप हिरकणी कक्ष सुरूच नाही.

स्ननदा मातांची गरज ओळखून शासनाने ही अतिशय चांगली योजना आणली. मात्र  त्याची फारशी अंमलबजावणी झालेली नाही. एस.टी. आगरांमध्ये  कार्यानावीत असलेले हिरकणी कक्ष गैरसोयीच्या ठिकाणी आहेत. याव्यतिरिक्त अन्य  सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे कक्षच नाहीत.

First Published on March 13, 2019 3:36 am

Web Title: center for pediatric feeding neglected due to lack of sufficient publicity