परदेशी काद्यांच्या विक्रीवरुन भुजबळांची बाजार समित्यांना चपराक

नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समित्यांची उभारणी स्थानिक शेतकऱ्यांच्या कृषिमालाची विक्री करण्यासाठी झालेली आहे. या परिस्थितीत परदेशी कांदा बाजार समितीत लिलावासाठी कसा येऊ शकतो, असा प्रश्न उपस्थित करून बाजार समित्यांनी त्यास प्रतिबंध करायला हवा, अशी अपेक्षा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त के ली. बाजार समित्या शेतकऱ्यांसाठी आहेत हे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी लक्षात ठेवायला हवे. परदेशातील माल विकण्यासाठी बाजार समित्या नाहीत. व्यापाऱ्यांनी परदेशी माल बाजार समितीत आणता कामा नये, असे भुजबळ यांनी खडसावले.

सोमवारी करोनाची आढावा बैठक भुजबळ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी  पत्रकारांशी संवाद साधताना भुजबळ बोलत होते.  जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, लासलगावसह अन्य ठिकाणच्या काही व्यापाऱ्यांनी तुर्कस्तान, इजिप्तवरून कांदा आयात केला आहे. त्यातील काही कांद्याची बाजार समितीत लिलावाद्वारे विक्री झाल्याचे सांगितले जाते. या संदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नावरून भुजबळ यांनी बाजार समिती पदाधिकाऱ्यांचे कान उपटले.

बाजार समित्या या स्थानिक शेतकऱ्यांसाठी आहेत, परदेशातून कांदा आणून विकण्यासाठी नाहीत. केंद्र सरकारने कांदा आयातीला परवानगी दिली आहे. ज्यांनी तो आयात केला, त्या व्यापाऱ्यांनी विक्रीची परस्पर व्यवस्था करावी. बाजार समितीच्या संचालकांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी परदेशी कांदा बाजारात विकला जाणार नाही याची दक्षता घ्यायला हवी.

बाजार समित्यांनी परदेशातील माल विक्रीला येऊ देता कामा नये, असे त्यांनी सूचित केले. कारवाईने हा प्रश्न सुटणार नाही. व्यापाऱ्यांनी परदेशी माल बाजार समितीत आणू नये. अनेक राज्यात बाजार समित्यांसारखी व्यवस्था नाही. तेथील व्यापारी ज्या पद्धतीने माल विकतात, तशी व्यवस्था संबंधितांनी करावी, असेही त्यांनी सूचित केले.

पंजाबमधील आंदोलनामुळे अन्नधान्याचा पुरवठा न झाल्याने रेशन दुकानांमध्ये अन्नधान्य उपलब्ध झाले नाही. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्नधान्य महामंडळाच्या गोदामातून ते उचलण्यास सांगण्यात आले आहे. मनमाडमधील गोदामातून अन्न धान्य उचलण्यासाठी मालमोटार, बसगाडय़ांची व्यवस्था केली जात आहे. कुठेही अन्नधान्याची कमतरता पडणार नसल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

राज्यपालांच्या सूचनेवर चिमटा

राज्यपाल हे लहानसहान गोष्टीत लक्ष घालत असून ही चांगली बाब आहे. त्यांचे राज्यावर अतिशय चांगले लक्ष आहे. पण, त्यांनी अर्णब गोस्वामी यांची चिंता करू नये. नियमानुसार त्यांची सर्व काळजी घेतली जाईल, असा टोला भुजबळ यांनी राज्यपालांना लगावला. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी अटक प्रकरणात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांना दूरध्वनी करून अर्णब यांची सुरक्षा आणि आरोग्याविषयी चिंता व्यक्त केली. या संदर्भात भुजबळ यांनी राज्यपालांच्या सूचनेवर टीकास्त्र सोडले. अर्णब खरेच आजारी असल्यास सरकारी डॉक्टर त्यांची तपासणी करतील. आवश्यकता भासल्यास रुग्णालयात न्यायचे की नाही, याचा निर्णय घेतील. मी किंवा तुम्ही आपण काही डॉक्टर नाहीत. त्यामुळे कायद्यानुसार, कारागृह नियमावलीनुसार सर्व काही होईल, असे भुजबळ यांनी सांगितले.