News Flash

नाशिकमध्ये करोना परिस्थिती हाताबाहेर

कठोर उपायांची गरज असल्याचे छगन भुजबळ यांचे संकेत

कठोर उपायांची गरज असल्याचे छगन भुजबळ यांचे संकेत

नाशिक : शहर आणि ग्रामीण भागातील बाजार, भाजीबाजार, किराणा दुकान सगळीकडे गर्दी आहे. करोना साखळी खंडित करण्यासाठी लागू के लेल्या कडक निर्बंधांना प्रतिसाद मिळालेला नाही.

परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. या संपूर्ण स्थितीची कल्पना मुख्यमंत्र्यांना देण्यात आली असून अधिक कठोर पावले उचलावी लागतील, असे संकेत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. जिल्ह्यात रेमडेसिविर आणि प्राणवायूचा प्रचंड तुटवडा भासत आहे. १० हजार रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी असतांना सरासरी ४०० ते ५०० इंजेक्शन प्राप्त होत आहेत. प्राणवायूची दैनंदिन गरज १३९ मेट्रिक टनावर गेली असून तोही केवळ ८७ मेट्रिक टन उपलब्ध होत असल्याकडे भुजबळ यांनी लक्ष वेधले.

देशात करोनाचा प्रादुर्भाव नाशिकमध्ये सर्वाधिक वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, शनिवारी पालकमंत्री भुजबळ यांनी बैठक घेऊन स्थितीचा आढावा घेतला. निर्बंध कठोर करूनही फारसा फरक पडलेला नसल्याचे त्यांनी सांगितले. अत्यावश्यकच्या नावाखाली गर्दी कायम आहे. व्यापाऱ्यांनी कुठलीही दुकाने सुरू ठेऊ नका, अशी मागणी केल्याचे भुजबळ यांनी नमूद केले. टाळेबंदीबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. रेमडेसिविरचा प्रचंड तुटवडा भासत आहे. २० एप्रिलनंतर या इंजेक्शनचा अधिकचा साठा उपलब्ध होईल. महाराष्ट्राच्या शेजारील राज्याने एक लाख ४२ हजार रेमडेसिविर मिळवल्याचा त्यांनी उल्लेख केला. शहर आणि ग्रामीण भागात २५६ लहान, मोठी रुग्णालये करोनाबाधितांवर उपचार करीत आहेत. त्यांची दैनंदिन प्राणवायूची गरज १३९ मेट्रिक टन असून सध्या केवळ ८७ मेट्रिक टन उपलब्ध होत आहे. कुणी बाधित बाहेर फिरत असेल तर नागरिकांनी त्याची माहिती यंत्रणांना द्यावी, कुंभमेळ्यातून काही जण येतील. त्यांनी तपासणी करावी, असेही त्यांनी सूचित केले. शासकीय, खासगी रुग्णालयात खाटा वाढविल्या जात असूनही प्रयत्नांना काही मर्यादा आहेत. प्राणवायूअभावी गंगापूर रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात काही रुग्णांचा मृत्यू झाल्याची तक्रार नातेवाईक करीत आहे. या प्रश्नावर त्यांनी प्राणवायूचा तुटवडा असून नातेवाईकांनी लेखी तक्रार केल्यास चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले. शहरासह ग्रामीण भागातील आणि इतर जिल्ह्यातील रुग्ण नाशिकमध्ये उपचारासाठी येत आहेत. त्यातील काही रुग्णांचा मृत्यू झाल्यास पार्थिव त्यांना गावी नेता येत नाही. स्थानिक पातळीवर अंतिम संस्कार करावे लागतात. यामुळे अमरधाममधील व्यवस्थेवरही ताण आल्याचे पालकमंत्री आणि पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2021 1:47 am

Web Title: chhagan bhujbal hint for strict lockdown in nashik zws 70
Next Stories
1 भुजबळ करोना काळजी केंद्राचे आज शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन
2 चाडेगाव शिवारात बिबटय़ा जेरबंद
3 वालदेवी धरणात बुडालेल्या सहाही जणांच्या मृतदेहांचा शोध
Just Now!
X