रेमडेसिविरसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

नाशिक : जिल्ह्यात रुग्णसंख्येच्या प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नसल्याने अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सलग तीन दिवस अन्न, औषध प्रशासनाचे आयुक्त परिमल सिंग यांच्याशी सातत्याने संपर्क साधून सूचना दिल्या. मात्र त्यानंतरही इंजेक्शनचे वितरण सुरळीत झाले नाही. आयुक्तांसमोर हतबल होण्याची वेळ भुजबळांवर आली. अखेर सोमवारी त्यांना थेट मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधावा लागला. रेमडेसिविर इंजेक्शनचे निश्चित सूत्रानुसार वितरण करावे, अशी मागणी भुजबळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

जिल्ह्यासाठी दररोज १० हजार रेमडेसिविरची मागणी असताना नाशिकला केवळ ४५० इंजेक्शनचा पुरवठा होत आहे. तुलनेत ठाणे, पुणेसह नागपूर शहराला तब्बल चौपट स्वरूपात म्हणजेच जवळपास १६०० हून जास्त इंजेक्शनचा पुरवठा केला जात आहे. लोकसंख्येच्या तुलनेत बाधितांची संख्या या शहरांपेक्षा नाशिक शहर व जिल्ह्यात अधिक असताना नाशिकमध्ये कमी प्रमाणात रेमडेसिविरचा पुरवठा होत असल्याने रुग्णांचे हाल होत असल्याकडे भुजबळ यांनी पत्राद्वारे लक्ष वेधले.

रेमडेसिविरच्या समन्यायी वाटपासाठी राज्यस्तरावरून सक्रिय रुग्णसंख्या विचारात घेऊन सूत्र निश्चित करण्यात आले. त्यानंतर राज्यातील उत्पादकांद्वारे साठा पुढील वितरणासाठी संबंधित जिल्ह्यातील वितरकांकडे प्राप्त होईल. जिल्हाधिकारी साठा जिल्ह्यात त्वरित वितरित करतील, अशा सूचना आहेत. त्यानुसार जिल्ह्यात २० एप्रिल रोजीची सक्रिय रुग्णसंख्या राज्याच्या एकू ण रुग्णसंख्येच्या ६.४८ टक्के असल्याचे दर्शविले आहे.

धुळे, अहमदनगर जिल्ह्याकरिता दिला जाणारा इंजेक्शनचा साठा नाशिक येथील वितरकांना देण्यात येतो. त्यामुळे तो साठा प्रत्यक्षात इतर जिल्ह्यांना जाणार असला तरी नाशिकच्या नावे नोंदविला जात असल्याने प्रत्यक्षात नाशिकला कमी साठा उपलब्ध होतो. रुग्णसंख्येच्या तुलनेत जो साठा उपलब्ध होणे गरजेचे आहे, त्यापेक्षा कमी साठा उपलब्ध होत आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यात जाणारा साठा हा त्याच जिल्ह्याच्या वितरकांच्या नावे देण्याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचित करावे. जिल्ह्यात रुग्णांच्या तुलनेत रेमडेसिविरचा साठा अतिशय कमी येत असल्याने नाशिककरांवर हा अन्याय असल्याकडे भुजबळ यांनी लक्ष वेधले.