सिडकोतील काही भागांत कमी दाबाने, तर काही भागांत गढूळ पाणीपुरवठा होत आहे. ऐन पावसाळ्यात अनेक भागात टंचाईला तोंड द्यावे लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. स्थानिक नगरसेवक, पालिकेचे अधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही तोडगा निघत नसल्याने या प्रश्नावर महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

शहरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना सिडको परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून कमी दाबाने आणि कमी वेळाने पाणीपुरवठा होत असल्याची महिला वर्गाची तक्रार आहे. अनेक कॉलनींमध्ये नागरिकांना आर्थिक पदरमोड करून टँकर मागवावे लागत आहे.

काही वेळा गंगापूर धरणातून पाणीपुरवठा झाला नाही, व्हॉल्व खराब, पाणी उचलताना शॉर्टसर्किट झाले अशी तांत्रिक कारणे देऊन पाणीपुरवठा विभागाकडून वेळ मारून नेली जाते. या विरोधात नागरिकांनी नगरसेवकांच्या संपर्क कार्यालयाकडे धाव घेतली. त्यांना जाब विचारत घेरावही घातला, परंतु लोकप्रतिनिधींसह पालिकेचे अधिकारी थातूरमातूर उत्तरे देत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. प्रभाग क्रमांक ३० आणि ३१ राणेनगर, पाथर्डी फाटा, चेतनानगर या भागांसह २४ आणि २५ मधील तिडके कॉलनी, भुजबळ फार्म परिसरात कमी दाबासह दूषित पाणी येत असल्याची तक्रार आहे. तिडके कॉलनी परिसरात कृत्रिम पाणी टंचाई भेडसावत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

वेळ वाढवली; कामचुकारांवर कारवाई

पाथर्डी फाटय़ासह अन्य ठिकाणी जाणवणारा पाण्याचा प्रश्न पाहता सातपूर येथील पाण्याच्या टाकीत येणाऱ्या पाण्याचा कालावधी तीन तासाने वाढवून घेतला आहे. तसेच कामचुकारपणा करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तातडीने बदली करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे दिला असून त्यानुसार कारवाई सुरू झाली आहे.

– सुदाम ढेमसे, नगरसेवक

अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे

सहा महिन्यांपासून कृत्रिम पाणी टंचाईच्या मुद्दय़ावर नगरसेवक सर्वसाधारण सभेत आवाज उठवत असताना संबंधित अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात. नागरिकांच्या नाराजीला आम्हाला तोंड द्यावे लागते. या संदर्भात पाणीपुरवठा विभागप्रमुखासह अन्य पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन लवकर हा प्रश्न सोडवावा, अन्यथा आंदोलनाला सामोरे जावे.

– पुष्पा आव्हाड, नगरसेविका

महिला त्रस्त

कमी दाबाने आणि कमी वेळा पाणी ही नित्याची समस्या झाली आहे. विशेषत: सणोत्सवात पाणीपुरवठा होत नसल्याचा अनुभव आहे. कॉलनीतील रहिवाशांना एकत्र येऊन बाहेरून टँकर मागवावा लागतो, तर स्वयंपाकासाठी जार मागविले जातात. परिसरातील काही नागरिक आपल्या जवळच्या नातेवाईकांकडून पाणी आणतात किंवा त्या ठिकाणी जाऊन धुणे, आंघोळीचे सोपस्कार पार पाडले जातात. वाढीव खर्चामुळे महिन्याचे अंदाजपत्रक कोलमडत आहे.

– भक्ती नारखेडकर,  गृहिणी

पाणीपुरवठय़ाचा प्रश्न सुटला

गंगापूर धरणात १५ दिवसांत दोन वेळा यंत्रणेत बिघाड झाला. वीजपुरवठा नसल्याने टाक्यांमध्ये पाणी चढविता आले नाही. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीला तोंड द्यावे लागले. नुकतीच ही अडचण दूर झाली असून पुढील काळात नियमित पाणीपुरवठा केला जाईल.

– ललित भावसार, कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा विभाग

जलवाहिन्यांमध्ये बदल

पाणी प्रश्नावर आवाज उठविल्याने एक इंची व्यासाच्या जलवाहिन्या बदलण्यात येत आहेत. तसेच पाणी प्रश्न सुटावा यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करत आहोत.

– भगवान दोंदे, नगरसेवक