विविध ‘डे’सह नृत्य, गायन, क्रीडा स्पर्धाचे आयोजन; नवे काही सादर करण्यासाठी तरुणाईची धडपड

नाशिक : डिसेंबर अखेरीस शहर परिसर गुलाबी थंडीची शाल लपेटत असतांना महाविद्यालयीन विश्व सांस्कृतिक महोत्सव आणि वेगवेगळे डेज् साजरे करण्यात दंग झाले आहे. काही महाविद्यालयांमध्ये कलामंडळांकडून तयारी सुरू झाली आहे. महोत्सवावर आपली छाप सोडण्यासाठी तरूणाई सज्ज झाली आहे.

महाविद्यालयाची पायरी चढत असतांना प्रत्येकाला महाविद्यालयाचा कट्टा, कलामंडळ, आवार खुणावत असते. अभ्यासात रमलेली ही मंडळी सबमिशनच्या नावाखाली मान मोडून अभ्यास वेळेत पूर्ण करण्यात गुंतलेली असतांनाच महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना हक्काचा विसावा म्हणून दुसऱ्या सत्रात सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन होते. काही ठिकाणी केवळ डेज सेलिब्रेशनची धमाल उडते. तर काही ठिकाणी स्वर-ताल-लय यांची जुगलबंदी होत असल्याने कलाविष्काराला बहर येतो. यंदाही  सांस्कृतिक महोत्सवातील स्पर्धा, वेशभूषा यांची मजा लुटण्यासाठी विद्यार्थ्यांंची जोरदार तयारी सुरू झाली आहे. आपले कार्यक्रम इतरांपेक्षा वेगळे होण्यासाठी विद्यार्थी घाम गाळत आहेत. ट्रॅडिशनल डे, रेट्रो डे, गृप डे, कॅप डे, प्रोफेशनल डे, मिसमॅच डे असे विविध डे साजरे करण्यासाठी कट्टय़ावर नव्या संकल्पना, योजनांवर वाद-विवाद झडत असतांना चहा-भजीची पार्टी रंगत आहे. सांस्कृतिक महोत्सवासाठी  नृत्य, गायन, क्रीडा स्पर्धाचे आयोजन होत असतांना काही मंडळी संहिता लेखनात गुंतली आहे. नवे काही देण्यासाठी, सादर करण्यासाठी तरूणाईची धडपड सुरू  आहे. याविषयी हं.प्रा.ठा. कला आणि रा.य.क्ष. विज्ञान महाविद्यालयाची प्राची महालेने आपली भूमिका मांडली. दरवर्षी ‘स्पंदन’ या सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून वर्षभर अभ्यास करून कंटाळलेले विद्यार्थी आपले कलागुण सादर करतात. महोत्सवात माझाही सहभाग असावा यासाठी एक महिन्यापासून तयारी सुरू असल्याचे तिने सांगितले. महोत्सवात खाद्य विक्रेत्याची भूमिका वठविण्याचा शुभम पाटील आणि त्याच्या मित्रांचा प्रयत्न आहे.

डेजच्या धामधुमीत ग्रुप लक्षात यावा यासाठी ११ वीत शिकणाऱ्या मित्र-मैत्रिणींनी खास टी शर्टवर छपाई करून घेतल्याचे के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या प्रथमेश पगारेने सांगितले. महाविद्यालयात डेजची धामधूम असली तरी नियोजनाचा भार महाविद्यालयावर पडू नये यासाठी काही विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. न. ब. ठाकूर महाविद्यालयात पुढील आठवडय़ापासून सुरू होणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवाची तयारी सुरू झाली असून ‘आपला महोत्सव’ ही भावना मनात ठेवून महोत्सव यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी प्रयत्नशील असल्याचे, रिद्धी भावसारने सांगितले. यंदा या महोत्सवाचा रंग विद्यार्थी प्रतिनिधी नसल्याने काहीसा फिका राहणार आहे. सांस्कृतिक महोत्सवाची जबाबदारी घेण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधी नसल्याने महाविद्यालयाच्या नियम-अटींमध्ये राहून महोत्सव साजरा करावा लागणार असल्याने काही चेहेरे हिरमुसले असले तरी  नाईलाज असल्याने तयारी करण्यात गुंतले आहेत.

महोत्सवात बदल होणे आवश्यक

कला महोत्सव किंवा डेज सेलिब्रेशन करतांना महाविद्यालयीन विद्यार्थी मूळ हेतूपासून भरकटतात. चित्र-विचित्र वेशभूषा करून सेल्फी काढण्यात ही मंडळी दंग असतात. वास्तविक दंगा मस्ती, डेज सेलिब्रेशनच्या पलिकडे जात कला, रंगमंचासाठी शहराच्या सांस्कृतिक-कला वर्तृळात नवे काय देता येईल याचा विचार होणे अपेक्षित आहे. महाविद्यालयाचा मनोरंजनाचा परीघ ओलांडत कलेच्या माध्यमातून व्यवसायिक मूल्ये रुजावीत, अशी अपेक्षा महाविद्यालय व्यवस्थापनाकडून व्यक्त होत आहे.