महापौर सतीश कुलकर्णी यांची सर्वसाधारण सभेत घोषणा

नाशिक : विकास आराखडय़ातील आरक्षित जागा टीडीआर देऊन महापालिकेकडे हस्तांतरित करताना अनेक घोटाळे झाले असून त्यांच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्याची घोषणा महापौर सतीश कुलकर्णी यांनी केली. टीडीआर घोटाळ्याचा विषय अनेक वर्षांपासून गाजत आहे.

महापालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन झाली. टीडीआर घोटाळ्याच्या प्रश्नाकडे भाजपचे गटनेते जगदीश पाटील, शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांनी लक्ष वेधले. २००१ मध्ये क्रीडांगणाकरिता आरक्षित जागा मालकाने टीडीआरच्या मोबदल्यात हस्तांतरणाचा प्रस्ताव सादर केला होता. त्यावर कार्यवाही होऊन तेव्हाच्या नियमाप्रमाणे मालकाला त्याच्या जमिनीच्या मोबदला स्वरूपात ७५ टक्के टीडीआर दिला गेला. परंतु मालकाने जमिनीचा आणि जमिनीवर मूळ मालकाच्या कुळाचा कब्जा त्यांच्याकडे नसताना ही जमीन मनपाकडे हस्तांतरित केल्याचे कागदोपत्री दर्शवून महापालिकेची फसवणूक करून टीडीआरचे प्रमाणपत्र प्राप्त करून घेतल्याची तक्रार जगदीश पाटील यांनी केली. ही फसवणूक उघडकीस येईल या भीतीने प्राप्त केलेला टीडीआर घाईघाईत विकून टाकला. या प्रकरणाची त्रयस्थ अधिकाऱ्यामार्फत उच्चस्तरीय समिती गठित करून चौकशी करून जमीन मालकावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी पाटील यांनी केली. गंगापूर रोडसह शहरात अनेक भागात टीडीआर घोटाळे झाले आहेत. त्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विलास शिंदे यांनी केली.

या संदर्भात चौकशीसाठी स्थापन करण्यात येणाऱ्या समितीत भाजप, सेना गटनेत्यांना समाविष्ट करण्यात आले आहे. महिला, बाल कल्याण समितीच्या सदस्या हिमगौरी आहेर-आडके यांनी राजीनामा दिला आहे. समितीच्या सभापतिपदासाठी निवडणूक होत आहे. भाजपचा एक सदस्य कमी झाल्यामुळे सत्ताधारी-विरोधकांचे संख्याबळ समसमान झाले. या पाश्र्वभूमीवर, आहेर यांच्या जागी भाजपकडून स्वाती भामरे यांची नियुक्ती झाल्याचे जाहीर करण्यात आले.

डॉ. प्रवीण अष्टीकरांची मूळ सेवेत रवानगी

करोनाकाळात महत्त्वाची जबाबदारी सांभाळण्याऐवजी डॉ. प्रवीण अष्टीकर दीर्घ रजेवर गेले. त्यांच्या कार्यपद्धतीवर सभेत सदस्यांनी आक्षेप नोंदविले. त्याची दखल घेत महापौरांनी डॉ. अष्टीकर यांना मूळ सेवेत परत पाठविण्याचे निर्देश दिले.