News Flash

शिक्षकांच्या प्रतीक्षेत एकाच वर्गात दोन इयत्तेच्या विद्यार्थ्यांना शिक्षण

पांजरवाडी आणि शिवाजीनगर येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी सध्या शाळेत शिक्षकांच्या प्रतीक्षेत आहे.

येवला तालुक्यातील पांजरवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षकांची प्रतीक्षा करावी लागते.

पांजरवाडीतील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी

येवला तालुक्यातील पांजरवाडीसह अन्य काही जिल्हा परिषदेच्या शाळेत वर्ग आणि शिक्षक यांचे प्रमाण व्यस्त असल्याने मुलांना शिक्षकांच्या प्रतीक्षेत बसावे लागते. इतकेच नव्हे तर, ज्या शाळेत सात वर्ग भरणे अपेक्षित आहे, तिथे वर्ग खोल्यांची संख्या कमी असल्याने एकाच वर्गात दोन इयत्तेतील विद्यार्थाना शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

खासगी शाळांप्रमाणे शासकीय शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी शिक्षण विभागाने गुणवत्तापूर्ण शिक्षणासह विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी सरकारी शाळा ‘डिजिटल’ करण्याचा संकल्प सोडला आहे.  ज्ञानवाद रचना, सिद्ध शाळा, गुणवत्तापूर्ण शिक्षण यासह विविध उपक्रमाच्या माध्यमातून  शिक्षण विभाग सध्या ‘प्रगतशील महाराष्ट्र’चे स्वप्न पहात आहे. मात्र आपल्या स्वप्नाला छेद देण्याचे काम खुद्द हा विभाग स्वत:च करत आहे, हे काही जिल्हा परिषदेच्या शाळांमधून निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीतून दिसत आहे. येवला तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १० हून अधिक शाळा आहेत. या शाळांमध्ये विद्यार्थी मोठय़ा संख्येने शिक्षण घेत असले तरी त्यांना नानाविध प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे.

या शाळांमध्ये शासकीय निकषानुसार दोन पदवीधर शिक्षक असणे गरजेचे आहे, असे असताना केवळ एक पदवीधर व अन्य पाच शिक्षक सेवेत आहेत आणि ते सर्व इयत्तांचा गाडा ओढत आहे. शिक्षकांची कमतरता असल्याने एका वर्गावर शिक्षक गेले की, दुसऱ्या वर्गातील विद्यार्थी त्यांच्या प्रतीक्षेत बसून रहातो, अशी परिस्थिती येथे आहे. इयत्ता सहावी व सातवीच्या वर्गात विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान, समाजशास्त्र विषय शिकवण्यासाठी शिक्षक नसल्याने इतर विषय शिक्षकांना हा शिकवण्याचा अधिकचा भार उचलत अध्यापनाचे काम करावे लागते. यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत सखोल ज्ञान पोहोचत की नाही, याबद्दल  याबद्दल पालकांनी चिंता व्यक्त केली आहे.   शाळेच्या मुख्याध्यापकाचे पद रिक्त असल्याने जयश्री अंगे या शिक्षिकेवर सध्या प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम पाहण्याची जबाबदारी आली आहे.  त्यामुळे ती जबाबदारी सांभाळताना जयश्री अंगे या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पूर्ण वेळ देऊ शकत नाही. मुख्याध्यापक पद प्रभारी असल्याने विविध दाखले, केंद्र शाखेतील महत्त्वपूर्ण बैठका, इतर माहिती याबाबत प्रभावीपणे प्रभारी मुख्याध्यापकांना काम करता येत नाही. यामुळे मोठय़ा अडचणी निर्माण झाल्या असून  ना अध्यापन, ना निर्णय घेण्याचा अधिकार अशा विचित्र कोंडीत जयश्री अंगे यांचे काम सुरू असल्याचे लक्षात येते, अशी एकंदरीत परिस्थिती आहे.

एरवी कोणत्याही शालेय कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांची भूमिका लोकप्रतिनिधी पार पाडत असता. उपदेशपर मार्गदर्शनही करीत असता. परिस्थिती समोर असतानाही  लोकप्रतिनिधी शाळेच्या प्रश्नांकडे लक्ष देताना दिसत नाहीत. शिक्षण विभाग, शासकीय निकष, अध्यादेशाकडे बोट दाखवत असल्याने दाद कोणाकडे  मागावी, असा प्रश्न पालकांना  पडला आहे.

सात ऐवजी सहा वर्ग

पांजरवाडी आणि शिवाजीनगर येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी सध्या शाळेत शिक्षकांच्या प्रतीक्षेत आहे. पांजरवाडी येथे इयत्ता पहिली ते सातवी वर्ग भरतात. एकूण १४६ विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत आहेत. या शाळेत इयत्तानिहाय सात वर्ग भरणे अपेक्षित असताना सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच शिक्षण विभागाच्या कृपेमुळे केवळ सहा वर्ग भरतात. वर्गांची संख्या अपुरी असल्याने हे वर्ग अन्य काही वर्गात एकत्रित करण्यात आले आहे. म्हणजे इयत्ता सात आणि वर्ग सहा अशी या शाळेची स्थिती आहे. वर्गाची ही स्थिती असताना शिक्षकांची कमतरता आहे.शिवाजीनगर शाळेत यापेक्षा दयनीय परिस्थिती आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात महत्त्वपूर्ण टप्पा ठरणाऱ्या दहावीच्या आधीची महत्त्वाची वर्षे शिक्षकांच्या प्रतीक्षेत जात असल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा होत असल्याची तक्रार पालक करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 3:34 am

Web Title: common classroom for two different standard in zilla parishad school
Next Stories
1 कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी जाहीर करा
2 ‘समृद्धी’ विरोधाने प्रशासनाच्या अडचणींत भर!
3 मालेगावमध्ये मोबाईलचे दुकान फोडणारे चार जण पोलिसांच्या ताब्यात
Just Now!
X