नियंत्रण मिळवणारी यंत्रणाही कचाटय़ात; जिल्ह्य़ाची रुग्णसंख्या तीन हजार पार

नाशिक : सहा ते सात दिवसांपासून शहरात करोनाचा कहर सुरू असून बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. करोनावर नियंत्रण मिळवण्यात व्यस्त असणाऱ्या यंत्रणाही आजाराच्या कचाटय़ात सापडत आहेत. शहरात सरासरी १०० नवीन रुग्ण सापडत असून तीन दिवसात २० जणांचा मृत्यू झाला. बुधवारी दुपापर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात नव्या ३७ रुग्णांची भर पडून जिल्ह्य़ाच्या आकडेवारीने तीन हजाराचा टप्पा ओलांडला.

अतिशय दाटीवाटीच्या मालेगावमध्ये करोनाचा इतक्या वेगाने फैलाव झाला नाही, त्यापेक्षा अधिक गतीने नाशिक शहरात करोना पसरत आहे. शहराची एकूण रुग्णसंख्या दीड हजाराचा टप्पा गाठण्याच्या मार्गावर आहे. २४ तासात आठ जणांचा मृत्यू झाला. तीन दिवसात करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या २० वर पोहचली आहे. दाट लोकवस्तीचे फुलेनगर, जुने नाशिक, नाईकवाडीपुरा, वडाळा असे भाग करोनाचे केंद्रबिंदू ठरले. इतर भागातही करोनाचे रुग्ण आढळत असतांना महापालिकेतील १६ अधिकारी, कर्मचारी बाधित झाले. यात पालिका आयुक्तांच्या स्वीय सहायकाचाही समावेश आहे. या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्यांमुळे ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. नगररचना विभागातील निकट संपर्कात आलेल्यांचे नमुने तपासण्यात आले. ते नकारात्मक आले. स्वीय सहाय्यकाच्या संपर्कातील व्यक्तींचे नमुने घेतले गेले असून त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

करोनामुळे मृत्युचे वाढणारे प्रमाणही चिंताजनक आहे. २४ तासात पेठरोडवरील दत्तनगर, पखाल रस्त्यावरील गुलमोहोर सोसायटी, चौक मंडई, काझीपुरा, फुलेनगर, भिमवाडी, जुने नाशिक येथील रुग्णांचा मृत्यू झाला. बाधितांची संख्या वाढत असल्याने प्रतिबंधित क्षेत्राची संख्या १६९ वर पोहचली आहे. बुधवारी दुपापर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात मखमलाबाद रोड, कोणार्कनगर आणि अन्य भागातील तीन असे एकूण पाच नवीन रुग्ण आढळले. शहरातील रुग्णसंख्या १३७८ वर पोहोचली. बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचे अहवाल प्राप्त होणे अद्याप बाकी आहे. उपचाराअंती ५५८ रुग्णांना घरी सोडण्यात आले. सध्या ७४२ रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णांची संख्या दररोज सरासरी १०० ने वाढत असल्याने उपलब्ध व्यवस्थेत उपचार करण्याचे आव्हान आहे.

सिन्नरमध्ये प्रादुर्भावात वाढ

येवला, सटाणा पाठोपाठ सिन्नरमध्ये रुग्णसंख्येत वाढ होऊन ते करोनाचे केंद्रबिंदू ठरण्याच्या मार्गावर आहे. गुरूवारी दुपापर्यंत १६१ संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३७ जणांचे अहवाल सकारात्मक आले. तर १२३ जणांचे अहवाल नकारात्मक आले. या अहवालामुळे जिल्ह्य़ाची रुग्णसंख्या ३३३५ वर पोहचली. नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये सिन्नरमध्ये करोनाचे सर्वाधिक १४ रुग्ण आहेत. विंचूर गवळी येथील दोन, पिंपळगाव गरुडेश्वर येथील तीन, पिंपळगाव बसवंत चार तर नांदगाव, भगूर, पिंपळगाव बहुला, मोहाडी, देवळाली कॅम्प येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.