•    आज संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार
  •    जिल्ह्य़ातील १५ मतदारसंघात १४८ उमेदवार
  •   अल्प काळात मतदारांपर्यंत पोहोचण्याची धडपड

प्रचार फेऱ्या, मोटारसायकल फेरी, जॉगिंग ट्रॅकवर गाठीभेटी, बैठकांचे सत्र, जाहीर सभा, रोड शो यामुळे पंधरा विधानसभा मतदारसंघात शिगेला पोहोचलेला आणि आरोप-प्रत्यारोपांनी ढवळून निघालेला विधानसभा निवडणुकीचा प्रचार शनिवारी सायंकाळी पाच वाजता थंडावणार आहे. आता सोमवारी होणाऱ्या मतदानाच्या आकडेवारीकडे आणि २४ तारखेला जाहीर होणाऱ्या निवडणूक निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्य़ातील १५ मतदारसंघात १४८ उमेदवार असून यात मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्षांचे एकूण ५३, मान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्षांचे २३ आणि उर्वरित ७२ अपक्षांचा समावेश आहे. नाशिक पश्चिममध्ये सर्वाधिक १९, तर दिंडोरीत सर्वात कमी म्हणजे पाच उमेदवार आहेत. नाशिक पश्चिममध्ये शिवसेनेचा, तर नांदगावमध्ये भाजपचा बंडखोर मैदानात आहे.

उमेदवारी जाहीर होण्यास बराच विलंब झाल्यामुळे उमेदवारांना प्रचारास फारसा अवधी मिळाला नाही. काही पक्षांनी अखेरच्या दिवशी सकाळी उमेदवारी जाहीर केल्याने त्यांची अर्ज भरताना तारांबळ उडाली होती. उपलब्ध काळात प्रत्येकाने मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी धडपड केली. अखेरच्या टप्प्यात जाहीर सभांनी वातावरण ढवळून निघाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे उद्धव ठाकरे, मनसेचे राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या सभांमधून प्रतिस्पध्र्यावर निशाणा साधला. काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांची मात्र शहरात सभा झाली नाही. काँग्रेसचे कोणी नेते प्रचारासाठी फिरकले नाही.

शहरातील एकही जागा सेनेला मिळालेली नाही. नाशिक पश्चिममध्ये भाजपविरोधात सेना पदाधिकाऱ्याने बंडखोरी केल्याने शिवसेनेचे कोणी बडे नेते प्रचारात थेट सहभागी झाले नाहीत. बंडखोराच्या प्रचारासाठी सेना नगरसेवक, पदाधिकारी मैदानात उतरले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनेचे आदित्य ठाकरे यांनी ग्रामीण भागात प्रचार केला. प्रचाराच्या रणधुमाळीत भाजप नेत्यांचा मोठा फौजफाटा शहर, जिल्ह्य़ात दाखल झाला होता. यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा, रासपचे महादेव जानकर आदी प्रचारात सहभागी झाले होते. तुलनेत विरोधी पक्षांच्या नेत्यांचे बळ कमी होते.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ यांनी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतल्या. खासदार अमोल कोल्हे यांनी शहर, ग्रामीण भागात सभा, रोड शो काढला. विरोधकांनी भाजपच्या तोफखान्याला प्रत्युत्तर देण्याचे प्रयत्न केले. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांसाठी शहरात प्रकाश आंबेडकर यांच्या सभेचे नियोजन होते. परंतु, ऐनवेळी ती रद्द झाली. मनमाडमध्ये आंबेडकर यांची सभा झाली. निवडणुकीत अपक्ष म्हणून उतरलेल्या अपक्षांनी आपापल्या पद्धतीने प्रचार करत मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न केला. शनिवारी प्रचार फेरी, मोटारसायकल फेरी, अधिकाधिक मतदारांच्या गाठीभेटी घेऊन प्रचार करण्याचा उमेदवारांचा प्रयत्न असणार आहे.