News Flash

‘हॉलमार्क’ दागिन्यांची ग्राहकांना प्रतीक्षाच

‘दागिने घडवताना सराफांना शुद्धता, पेढीचे नाव अंकित करणे बंधनकारक झाले आहे.

नवी नियमावली ऑगस्टपासून

नाशिक : राज्यातील मोठ्या जिल्ह््यांमधील सर्व सराफी पेढ्यांमध्ये फक्त सोन्याची शुद्धता प्रमाणित केलेले (हॉलमार्क) दागिने उपलब्ध होण्यासाठी अजून किमान दीड महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. याबाबतचा निर्णय लागू झाला असला तरी अजूनही नोंदणी प्रणालीत काही बदल अपेक्षित असल्याने त्यास ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. मात्र हॉलमार्कच्या नियमावलीमुळे सोन्याच्या व्यवहारात पारदर्शकता येऊन ग्राहकांची फसवणूक होणार नाही.

सरकारने प्रारंभी या स्वरूपाचे केवळ १४, १८ आणि २२ कॅरेटचे दागिने विकण्यास परवानगी दिली होती. राज्यातील सराफी व्यावसायिकांच्या मागणीनुसार यात २०, २३ आणि २४ कॅरेटचे दागिने समाविष्ट करण्यात येणार आहेत. जळगावच्या सुवर्ण नगरीसह राज्यातील काही मोठ्या सराफी पेढ्या आधीपासून ‘हॉलमार्क’च्या दागिन्यांची विक्र्री करतात. तथापि, त्यांची संख्या कमी आहे.

जळगाव येथील एक ग्राहक विजया राणे म्हणाल्या, ‘मी शहरातील एकाच सराफी पेढीतून विश्वासाने सोने खरेदी करते. अशा वेळी दागिने किती कॅरेटचे इतकीच माहिती घेतली जाते. त्यांची शुद्धता प्रमाणित केलेली आहे की नाही, याबद्दल ग्राहक अनभिज्ञ असतात.’ असे अनेक ग्राहक आहेत.

‘दागिने घडवताना सराफांना शुद्धता, पेढीचे नाव अंकित करणे बंधनकारक झाले आहे. काही ठिकाणी शुद्धतेविषयी फसवणूक होत असे. नव्या नियमावलीमुळे त्यास चाप बसेल. दागिने उत्पादनाची माहिती व्यावसायिकांना ठेवावी लागेल. सोन्यातील भेसळीला प्रतिबंध बसेल. शुद्धता प्रमाणित न करता दागिन्यांची विक्री केल्यास व्यावसायिकांवर कारवाई होईल.’ असे ललवाणी यांनी सांगितले. नव्या नियमावलीचा काही मोठ्या सराफी पेढ्यांना फारसा फरक पडणार नाही. कारण या पेढ्या आधीपासून हॉलमार्कचे दागिने विकतात.

जुन्या दागिन्यांना अडचण नाही..

‘ग्राहकांकडील शुद्धता प्रमाणित नसलेल्या जुन्या दागिन्यांसाठी हा नियम अडचणीचा नाही. त्यांची विक्री करताना वा गहाण ठेवताना संबंधितांकडून त्यांच्या शुद्धतेची पडताळणी करण्यात येईल. सराफांना ते खरेदी करण्याची परवानगी आहे. याच धर्तीवर आजही ही प्रक्रिया सुरू आहे,’ असे नाशिक सराफ व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष गिरीश नवासे यांनी सांगितले.

नियम काय?

’केंद्र सरकारने १६ जूनपासून देशातील २५६ जिल्ह््यांमध्ये सर्व सराफांना शुद्धता प्रमाणित केलेले दागिने विकणे बंधनकारक केले. यात राज्यातील प्रमुख जिल्ह्यांचा समावेश आहे. निर्णयाची अंमलबजावणी झाली असली तरी नोंदणीप्रणालीत काही बदल करणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा दागिन्यांच्या विक्रीस दीड महिन्याची मुदतवाढ देण्यात आल्याचे जळगाव सराफ व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष अजय ललवाणी यांनी सांगितले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना ऑगस्ट २१ पर्यंत दंड केला जाणार नाही.

बंधनकारक कुठे?  मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, अकोला, अमरावती, धुळे, लातूर, नांदेड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, नागपूर, पालघर, रायगड, अहमदनगर व सोलापूर या २२ जिल्ह्यांमध्ये सराफांना हॉलमार्कचे दागिने विकणे बंधनकारक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2021 2:23 am

Web Title: customers are waiting for hallmark jewelry akp 94
Next Stories
1 वर्षभरात ४४ हजारपेक्षा अधिक वंचितांना शिधापत्रिका वाटप
2 ग्रामसभेत ग्रामसेवकास मारहाण
3 डेल्टा प्लस स्वरुपात करोनाचे नवीन आव्हान
Just Now!
X