५८ गावे, ४५ वाडय़ांना टँकरने पाणी

नाशिक : करोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा सहन करणाऱ्या जिल्ह्यत टंचाईचे संकट गडद होत आहे. चक्रीवादळाच्या प्रभावाने सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. वातावरणात गारठा पसरल्याने प्रचंड उकाडय़ाने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा कायम आहेत. जिल्ह्यात सध्या ५८ गावे आणि ४५ वाडय़ांना ४७ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. ३५ गावे आणि ११ टँकरसाठी एकूण ४६ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. अनेक गावात एखाद्या विहिरीत वा हातपंपालाच पाणी असते. पाणी भरण्यासाठी होणाऱ्या गर्दीने करोनाचे नियम पाळणे अवघड ठरत आहे.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर टाळेबंदी जिल्ह्यत लागू झाली आहे. अत्यावश्यक, वैद्यकीय कारणशिवाय घराबाहेर पडण्यास बंदी असली तरी ग्रामीण भागात मात्र पाण्यासाठी भटकंती क्रमप्राप्त ठरली आहे. शहराच्या पाठोपाठ ग्रामीण भागात करोनाचा फैलाव झाला आहे. अनेक गावात एखादी विहीर किं वा काही हातपंपांना पाणी असते. तिथे पाणी भरण्यासाठी सकाळपासून महिलांसह लहानग्यांची लगबग सुरू असते. यावेळी सुरक्षित अंतर वा तत्सम नियमांचे पालन कसे होईल, हा प्रश्न आहे.

निवडणूक हंगामात राजकीय मंडळी टँकरने पाणी देण्याकरिता धडपड करतात. सध्या ग्रामीण भागात लगेच कोणतीही निवडणूक नसल्याने राजकीय पातळीवर शांतता आहे. यामुळे तहानलेल्या गावांची प्रशासनावर भिस्त आहे. धरणातील जलसाठा कमी होत असताना ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आटत आहेत. करोनाच्या संकटात टँकरचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले. जेणेकरून टंचाईग्रस्त गावाचा प्रश्न लवकर मार्गी लावण्याचे नियोजन करण्यात आले.

जिल्ह्यात येवला तालुक्यास टंचाईची सर्वाधिक झळ बसली आहे. या तालुक्यातील २८ गावे आणि २० वाडय़ांना १८ टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे. बागलाण तालुक्यात चार गावे (चार टँकर), चांदवड आठ गावे व तीन वाडी (सहा टँकर), देवळा दोन गावे व एक वाडी (दोन टँकर), इगतपुरीत आठ वाडय़ांना (तीन टँकर), मालेगाव तालुक्यात तीन गावांना (दोन टँकर), पेठमध्ये आठ गावे, सहा वाडय़ांना (सात टँकर), सुरगाणा तालुक्यात तीन गावांना (दोन टँकर), त्र्यंबकेश्वरमध्ये एक गाव व सात वाडय़ांना (दोन टँकर) असा पाणी पुरवठा होत आहे. जिल्ह्यात सध्या एकूण १०३ गाव-वाडय़ांना ४७ शासकीय-खासगी टँकरने पाणी पुरवठा होत आहे. या टँकरच्या दैनंदिन ११४ फेऱ्या होत असून या माध्यमातून ८२ हजार ८८३ लोकसंख्येला पाणी दिले जात आहे. गावात पाण्याचा टँकर आला की, महिलांसह पुरुषांची पाणी भरण्यासाठी धावपळ उडते. यावेळी करोना नियमावलीचे पालन होत नाही. नाशिक, निफाड, सिन्नर, कळवण दिंडोरी या तालुक्यात अद्याप टँकरची गरज भासलेली नाही.

४६ विहिरींचे अधिग्रहण

गावांची तहान भागविण्यासाठी ३५ तर टँकरसाठी एकूण ११ अशा एकूण ४६ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या. यात सर्वाधिक १६ कळवण तालुक्यात, बागलाणमध्ये पाच, चांदवड, दिंडोरी व मालेगाव तालुक्यात प्रत्येकी दोन, पेठ १२, देवळ्यात सहा आणि त्र्यंबकमध्ये गावासाठी एक विहीर अधिग्रहित करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.