अविश्वास ठरावास नागरिकांचा विरोध

शेती, मोकळ्या जागांवरील कर आकारणीच्या मुद्यावरून राजकीय पक्ष आणि नियमांचे पालन न केल्याने कारवाईच्या कचाटय़ात सापडलेल्या काही संघटनांनी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात मोर्चेबांधणी सुरू केली असली तरी दोन महिन्यात त्यांच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळे झालेल्या बदलांकडे जागरुक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.  त्यामुळे आयुक्तांविरुद्धच्या अविश्वास ठरावास त्यांनी विरोध दर्शविला आहे.

हरित क्षेत्राप्रमाणे पिवळ्या क्षेत्रातील शेतजमिनी, मोकळ्या जागांवरील मालमत्ता करवाढ मागे घ्यावी, याकरिता सत्ताधारी भाजपसह विरोधकही एकत्र आले आहेत. संबंधितांकडून पालिका आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा विचार सुरू आहे. राजकीय पक्षांच्या या कार्यशैलीविरुद्ध नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. पालिका आयुक्तपदाची धुरा सांभाळून मुंढे यांना केवळ दोन महिन्यांचा अवधी झाला आहे. या काळात त्यांनी महापालिकेच्या कामात आमुलाग्र बदल केले. अतिक्रमणधारक, मालमत्ता थकबाकीदार, महापालिकेची मालमत्ता अनधिकृतपणे ताब्यात ठेवणारे अशा अनेकांविरुद्ध एकाचवेळी कारवाईचे अस्त्र उगारले.

वेळेवर स्वच्छतेची कामे होत आहेत. पालिकेशी निगडित कामांसाठी कालमर्यादा निश्चित करून दिली गेली. यामुळे रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभे करणे, कानाकोपऱ्यात फोफावलेली अतिक्रमणे, देवघेव संस्कृती, नियमबाह्य़ कामांचा महापूर, जनतेला दाद न देणारे अधिकारी या आणि अशा समस्या वाढून त्यांचा भस्मासूर नाशिककरांसमोर उभा ठाकला आहे. या परिस्थितीत महापालिकेत तुकाराम मुंढे आल्यानंतर सक्रिय झालेला अतिक्रमण निर्मूलन विभाग, शहर स्वच्छतेसाठी चाललेले प्रयत्न, मोकळे होऊ लागलेले रस्ते यामुळे सर्वसामान्य नाशिककर १०० टक्के सुखावलेले आहेत. आयुक्तांच्या नियमाधारित कार्यपद्धतीमुळे दुखावलेल्या गटांनी मालमत्ता कराच्या मुद्यावरून त्यांच्याविरुद्ध ओरड सुरू केल्याचे लक्षात येते. हितसंबंध दुखावलेली मंडळी आक्रोश करणारच. मात्र सुज्ञ नाशिककरांनी या मंडळींच्या, गटांच्या फसव्या विरोधाला बळी पडू नये. शहराला सुदैवाने मिळालेला चांगला अधिकारी आणि त्यांचे काम यांच्या पाठीशी उभे राहण्याची सध्या गरज आहे.

अ‍ॅड. सिद्धार्थ वर्मा-सोनी, पदाधिकारी, सजग नागरिक मंच, वीज ग्राहक समिती